पुणे – कष्टाने जमविलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवावे आणि ते दामदुप्पट व्हावे अशी अपेक्षा जवळपास सर्वच जण बाळगून असतात. यासंदर्भात अनेक ऑफर्स असतात. पण, बऱ्याचदा त्यात फसवणूक होते. मात्र, एक अशी सरकारी योजना आहे की ज्यात आपण पैसे गुंतवले तर ते नक्कीच दुप्पट होतात. त्याचे अनेक सारे फायदे आहेत.
किसान विकास पत्र (केव्हीपी) ही भारतीय पोस्टाने देऊ केलेल्या नऊ लहान बचत योजनांपैकी एक चांगली योजना आहे. आपल्याला बचतीची रक्कम जमा करून दुप्पट करायची असेल, तसेच कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर ही योजना तुमच्यासाठी बचत करण्याचा उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकते. या पोस्ट ऑफिस इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये, ठेवीदाराला त्याच्या डिपॉझिटवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो. किसान विकास पत्र योजनेचा दावा आहे की या अंतर्गत तुमची ठेवीची रक्कम 10 वर्षे आणि 4 महिन्यांत (124 महिने) दुप्पट होईल.
या पोस्ट ऑफिस मधील योजनेच्या नावावरून हे स्पष्ट होते की, सदर योजना शेतकऱ्यांसाठी आहे. परंतु आता कोणतीही व्यक्ती त्यात ठेवीदार बनू शकते. या योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीला केव्हीपी प्रमाणपत्र खरेदी करण्यासाठी किमान 1 हजार रुपये गुंतवावे लागतात. या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवणूक करताना फक्त 1 हजार रुपयांच्या पटीत करता येते. तसेच गुंतवणुकीसाठी कोणतीही वरची मर्यादा नाही. तथापि, जर या अंतर्गत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करत असाल तर ग्राहकाला पॅन कार्डचा तपशील द्यावा लागतो.
या अंतर्गत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही भारतीय व्यक्ती आपले खाते उघडू शकतो. मात्र, खाते उघडण्यासाठी वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही. याअंतर्गत, मुलांच्या नावाने केव्हीपी प्रमाणपत्रे देखील खरेदी केली जाऊ शकतात.
या पोस्ट ऑफिस योजनेत गुंतवलेल्या रकमेसाठी प्रमाणपत्र दिले जाते. या अंतर्गत गुंतवणुकीवरील व्याज अर्थ मंत्रालयाने निश्चित केलेले आहे. मात्र ते बाजारातील जोखमीशी संबंधित नाही. भारतीय पोस्टच्या या योजनेअंतर्गत सध्या 6.9 टक्के वार्षिक व्याजदराचा लाभ मिळत असून व्याज दरवर्षी वाढते.