इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मद्य किंवा दारूचे व्यसन हे शरीरासाठी नुकसानदायक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच दारुचे व्यसन सोडवण्यासाठी नागरिक वेगवेगळे उपाय करतात. आहे, आपल्या सर्वांनाच माहित आहे. पण, सरकारच नागरिकांना दारु प्या असे म्हणत असेल तर. हो हे खरे आहे. सरकार असे का सांगत आहे, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण, त्यामागे मोठे कारण आहे.
जपानमध्ये चक्क सरकारकडूनच नागरिकांना विशेषतः तरुणांना दारु पिण्याचं आवाहन करण्यात येत आहे. इतकेच नाही तर सरकारकडून यासाठी वेगवेगळे उपक्रमही राबवण्याचा विचार सुरु आहे. तरुण पिढीचे दारु पिण्याचे प्रमाण प्रौढांच्या दारू पिण्याच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे दारूवरील कर कमी झाला आहे. याचा परिणाम महसूलावर होऊ शकतो. नागरिकांना दारू प्यायला लावण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेच्या माध्यमातून सरकारने ही कल्पना मागवली आहे. या स्पर्धेत पुरस्काराची योजनाही ठेवण्यात आली आहे.
तरुण पिढीमध्ये अधिक मद्यपान केल्याने जपानच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. स्पर्धेत, सहभागींना जास्त मद्य सेवन, आकर्षक ब्रँडिंग आणि उद्योगांना प्रोत्साहन देण्याची मुख्य कल्पना द्यावी लागेल. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत २० ते ३९ वयोगटातील युवक सहभागी होऊ शकतात. या विचारांतर्गत तरुणांना त्यांच्या पिढीत दारूचे सेवन कसे अधिक प्रमाणीत करता येईल सुचवावे लागेल. दारू विक्रीत लक्षणीय घट झाल्याने हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये स्पर्धकांमध्ये प्रमोशन, ब्रँडिंग यासह अत्याधुनिक योजनांवरही रणनीती आखावी लागेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला प्राधान्य दिले जाणार आहे.
जागतिक बँकेच्या मते, जपानमध्ये एक तृतीयांशहून जास्त तरुण पिढी आहे. जपानमधील लोकसंख्येपैकी एक तृतीयांश म्हणजेच 29 टक्के लोकसंख्या 65 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत. जगातील सर्वाधिक प्रमाण जपानमध्ये आहे. जपानची चिंता केवळ अर्थव्यवस्थेची नाही. त्यापेक्षा काही नोकऱ्या, तरुण कर्मचाऱ्यांचा पुरवठा, भविष्यात वृद्धांची काळजी आदी समस्याही सोडविण्याचे नियोजन केले जात आहे.
जपान सरकारने तरुणांना अधिक दारू पिण्यास प्रोत्साहित करण्यासाठी मोहिमेसाठी एक वेबसाइट देखील सुरु केली आहे. टॅक्स एजन्सीच्या अलीकडील आकडेवारीनुसार, 1995 च्या तुलनेत 2020 मध्ये लोक कमी दारू पीत होते. अंदाजे दारु सेवन एक चतुर्थांश कमी झालं आहे. 1980 मध्ये एकूण महसुलाच्या पाच टक्के महसूल दारुवरील कराने गोळा केले. तर 2020 मध्ये हा आकडा केवळ 1.7 टक्के होता. जपानी माध्यमांनी सांगितलं आहे की, ‘आरोग्यसाठी हानिकारक असलेल्या दारू पिण्याच्या आवाहनाबाबत जपान सरकारला टीकेसह संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.
काही नागरिकांनी आपले विचार सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत. इच्छुक तरुण सप्टेंबर महिन्या अखेरपर्यंत याउपक्रमात सहभागी होऊ शकतात. नोव्हेंबरमध्ये अंतिम प्रस्ताव मांडण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. यानंतर, अधिक दारू पिण्यासाठी जपान सरकारकडून एक योजना विकसित केली जाईल, असे सांगण्यात येते.
This Government Appeal to Citizen for Drink Liquor
Japan