इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रिस्टियानो रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. इंस्टाग्रामवर रोनाल्डोचे ४२ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. जॉर्जिना रॉड्रिग्जचेही साडेतीन करोडहून अधिक फॉलोअर्स आहेत. रोनाल्डो आणि जॉर्जिना जाहिरात मोहिमेतूनदेखील चांगली कमाई करतात. मॉडेल आणि इंस्टाग्राम इन्फ्ल्युएन्सर जॉर्जिना रॉड्रिग्जला विविध उत्पादनांच्या जाहिरातीसाठी ब्रँड्सकडून दरमहा एकूण आठ हजार युरो मिळतात, परंतु हा तिच्या कमाईचा एकमेव स्त्रोत नाही.
स्पॅनिश टीव्ही शो ‘विवा ला विडा’नुसार, क्रिस्टियानो रोनाल्डो जॉर्जिनाच्या बँक खात्यात दर महिन्याला सुमारे एक लाख युरो (सुमारे ८२.६५ लाख रुपये) ट्रान्सफर करतो. रोनाल्डो ही रक्कम जॉर्जिनाला मुलांच्या संगोपनासाठी आणि इतर खर्चासाठी देतो. रोनाल्डो घरापासून दूर असताना जॉर्जिना आपल्या मुलांची काळजी घेते. स्टार फुटबॉलरने गर्लफ्रेंडला दिलेल्या या रकमेचे ब्रिटिश मीडियाने ‘पगार’ असे वर्णन केले आहे.
रोनाल्डोने यापूर्वी जॉर्जिनाला कार गिफ्ट केली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये त्या कारची किंमत सुमारे १.५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. रोनाल्डो आणि जॉर्जिना राजेशाही जीवनशैली जगतात. जॉर्जिनाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्येही याची झलक पाहायला मिळत आहे. जॉर्जिना आणि रोनाल्डो २०१७ पासून एकत्र आहेत
प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे अद्याप लग्न झालेले नाही. मात्र, तो आतापर्यंत अनेक महिलांच्या संपर्कात आलेला आहेत. त्याला वेगवेगळ्या महिलांपासून ४ मुले आहेत. रोनाल्डो आणि जॉर्जिना रॉड्रिग्ज गेल्या ५ वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये आहेत. त्यांना ३ वर्षांची मुलगीही आहे.
रोनाल्डो आणि जॉर्जिनीच्या मुलीचे नाव एलाना मार्टिना डॉस सॅंटोस एवेरो आहे. गेल्या वर्षी २८ ऑक्टोबर रोजी क्रिस्टियानो रोनाल्डोने इंस्टाग्रामवर माहिती दिली होती की त्याची गर्लफ्रेंड आणि पार्टनर जॉर्जिना रॉड्रिग्ज जुळ्या मुलांची आई होणार आहे. जॉर्जिनाच्या दैनंदिन जीवनावर नुकताच नेटफ्लिक्सवर एक माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे. स्पॅनिश मॉडेल जॉर्जिना एकाच वेळी आई, व्यवसायिक, भागीदार आणि प्रभावकाराची भूमिका कशी साकारत आहे यावर या माहितीपटातून प्रकाशय टाकण्यात आला आहे. जॉर्जिना प्रसिद्ध फॅशन ब्रँड ‘गुच्ची’ची मॉडेल राहिली आहे.
जॉर्जिना रॉड्रिग्जला डेट करण्यापूर्वी, क्रिस्टियानो रोनाल्डो माजी मिस स्पेन डेझियर कॉर्डेरोसोबत रिलेशनशिपमध्ये होता. २०१७ मध्ये, रोनाल्डोने एका मुलाखतीत सांगितले की त्याला सात मुलांचा बाप होण्याची इच्छा आहे.