नाशिक – नाशिक महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गणेशोत्सव २०२२ साठी परवाना शुल्क माफ करण्याबाबत आज २० ऑगस्ट रोजी निर्णय घेतला आहे. महापालिकेत आज ठरावाव्दारे नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव २०२२ करीता महानगरपालिकेच्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात उभारण्यात येणारे मंडप, स्टेज, कमान इत्यादिंचे परवाना शुल्क चालू आर्थिक वर्षाकरीता माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव मंडळांसाठी हा मोठा दिलासा आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज २० ऑगस्टपासून होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी हा निर्णय लागू असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव २०२२ करीता मनपा जागांवर उभारणी केलेले मंडप, स्टेज, कमान यांना परवाना शुल्क माफ करणेबाबत सर्व महानगरपालिकांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.