इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रसिद्ध बंगाली चित्रपट अभिनेते बोनी सेनगुप्ता याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपकडून आश्वासने पूर्ण केली जात नसल्याचा आरोप बोनीने केला आहे. यासंदर्भात बोनी सेनगुप्ता यांनी सोशल मीडियावर ट्विट करून भाजप सोडण्याची घोषणा केली आहे.
विशेष म्हणजे बोनी सेनगुप्ताची आई पिया सेनगुप्ता आणि त्यांची मैत्रीण कौशली मुखर्जी हे तृणमूल काँग्रेसचे चेहरे आहेत. अशा स्थितीत बोनी सेनगुप्ता याने भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने सर्व प्रकारच्या अटकळ बांधल्या जात आहेत. मात्र, बोनी सेनगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावरही सर्वांनाच आश्चर्य वाटले होते आणि त्याबद्दल बरीच चर्चाही झाली होती. बोनीने ट्विट करत लिहिले की, “भारतीय जनता पक्षासोबतचे नाते आज संपुष्टात आले आहे. पक्ष आपली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरला आहे आणि त्यांनी बंगाल किंवा बंगाली चित्रपट उद्योगासाठी दिलेली विकासाची आश्वासनेही प्रत्यक्षात आली नाहीत.
बोनीच्या ट्विटमध्ये त्याची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. तथापि, बोनीच्या भाजप सोडण्याच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांना आणि इतरांनाही आश्चर्य वाटलेले नाही. कारण बोनी याने विधानसभा निवडणुकीपासूनच स्वतःला भाजपपासून दूर ठेवले होते. बोनीने म्हटले आहे की, जो पक्ष सन्मान देऊ शकत नाही, तो बंगालच्या विकासासाठी काय करणार. मला वाटले की हा पक्ष बंगाली चित्रपट उद्योगाचा विकास करेल. पण त्याने कलाकारांचा अपमान केला आहे.
https://twitter.com/bonysengupta/status/1485557096556863489?s=20
मुलाने भाजप सोडल्याबद्दल, त्याची आई पिया सेनगुप्ता म्हणाली, “ते व्हायचे होते. त्या पक्षात कोणीही आनंदी राहू शकत नाही. बंगालची कला, संस्कृती आणि विचार भाजपशी जुळत नाही. मुलगा आज घरी परतला. त्यात मी आनंदी आहे.” बोनी सेनगुप्तापूर्वी अभिनेत्री श्रवंती चॅटर्जी आणि बाबुल सुप्रियो यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. हळूहळू बंगालमधील स्टार्सचा विश्वास भारतीय जनता पक्षावरुन उठत असताना दिसत आहे.