– मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दोन्ही सहकारी पक्षांबद्दल नाराजी
– मराठा आरक्षणासंबंधीही विचार विमर्श…
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अनेक दिवसांनंतर बुधवारी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकार चालवणे ही केवळ आमच्या पक्षाची म्हणजे शिवसेनेची जबाबदारी नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील तितकीच जबाबदारी आहे, असे सांगत दोन्ही सहकारी पक्षांविषयी पवारांकडे नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्याचवेळी मराठा आरक्षण, चक्रीवादळाने झालेले नुकसान, कोरोना स्थिती आदि मुद्यांवरही चर्चा झाल्याचे कळते.
गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले असून दोन्ही घटक पक्षांच्या काही नेत्यांकडून परस्पर विरोधी भूमिका मांडली जात आहे, सहाजिकच त्यामुळे जनतेच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण होते तर विरोधकांना आयते कोलीत मिळते. त्यातच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसोबत झालेली खडाजंगी, काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावरून केलेली टीका, मंत्री आवाज चढवून मंत्रिमंडळ बैठकीत बोलत असल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. या सगळ्या कुरबुरींच्या पार्श्वभूमीवर रात्री शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या तीव्र भावनांना मोकळी वाट करुन दिली. राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे ध्यानात आणून दिल्याचे सांगण्यात येते.
या बैठकीत मराठा आरक्षणाचा पेच, तौक्ते चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे राज्यापुढे उभे ठाकलेले आर्थिक संकट, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना या विषयांवरही चर्चा झाली. गेल्या काही दिवसांत विविध घटकातील लोकांनी पवारांची भेट घेतली होती. लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या समस्यांचं निवेदन या घटकांनी पवारांना दिले. त्यामुळे पवारांनी या घटकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्याचे आहेत. तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचे कळते.
दरम्यान, नुकतेच आलेल्या तौक्ते वादळामुळे कोकणासह राज्यातील अनके भागाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केंद्राकडून खूप कमी मदत मिळाली आहे. त्यावर आणि राज्याकडून जाहीर करावयाच्या पॅकेजवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. पण म्युकर मायकोसिसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे काय करायचे ? याबाबत मुख्यमंत्र्यांनी पवारांशी विचार विमर्श केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे आज गुरुवारी दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याच्या मुद्द्यावरुन ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता असून काँग्रेस पक्ष पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आग्रही आहे. त्यामुळे या बैठकीत काय घडणार, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.