इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील मोठ्या कंपनीने १२ हजाराहून अधिक कर्मचा-यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी २०२६ या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२५ ते मार्च २०२६) २ टक्के कपात करणार आहे. आज या कंपनीचे ६ लाख १३ हजार कर्मचारी आहेत. त्यामुळे २ टक्के प्रमाणे १२ हजार २०० लोकांना या नोकरकपातीचा फटका बसू शकेल.
या नोकरकपातीबाबत टीसीएसचे सीईओ के. कृतिवास यांनी सांगितले की, नवीन तंत्रज्ञानाकडे विशेषत एआय आणि ऑपरेटिंग मॅाडेलमध्ये बदलांकडे वाटचाल करत आहेत. यामुळे काम करण्याची पध्दत बदलत आहे. कंपनीने कर्मचा-यांचे कौशल्य वाढवण्याचा आणि पुन्हा नियुक्त करण्याच प्रयत्न केला. परंतू, काही भूमिका अशा होत्या जिथे हे शक्य नव्हते. त्यामुळे ही टाळेबंदी आवश्यक होती. मध्यम आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचा-यावर त्याचा परिणाम होणार आहे. माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंत सर्वात कठीण निर्णय़ असल्याचेही त्यांनी म्हटले.
टीसीएसने हा निर्णय घेतांना म्हटले आहे की, प्रभावित कर्मचा-यांना नोटिस कालावधी वेतन तसेच अतिरिक्त विच्छेदन पॅकेज, आरोग्य विमा आणि आउटप्लेसमेंट सहाय्य प्रदान करेल. टाळेबंदीचे कारण एआय नाही तर पुनर्कौशल्य आणि तैनातील मर्यादा आहेत.