नवी दिल्ली – दिवाळी काळामध्ये बोनसवर काही कंपनीच्या वतीने कर्मचार्यांना वेगवेगळ्या भेट वस्तू देण्यात येतात. एखाद्या कंपनीने कर्मचाऱ्यांना खूप मोठे गिफ्ट केल्याची बातमी ऐकली असेलच. पण आता एक भारतीय कंपनी नवीन जॉइन झाल्यावर आपल्या कर्मचार्यांना चक्क बीएमडब्ल्यू बाइक्स देणार आहे.
होय! आपल्याला आश्चर्य वाटेल पण भारत पे कंपनी त्यांच्या टेक टीमला आणखी सक्षम करण्याची योजना आखत आहे. नवीन उमेदवारांना कंपनीकडे आकर्षित करण्यासाठी कंपनी ही ऑफर देत आहे. याबाबत कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, व्यापारी आणि ग्राहकांच्या सेवेसाठी काही नवीन उत्पादने बाजारात आणली जातील. त्यासाठी आम्ही टेक टीममध्ये १०० नवीन लोक घेणार आहोत.
कंपनीत नवीन सामील होण्यास ‘बाइक पॅकेज’ आणि ‘गॅझेट्स पॅकेज’ दरम्यान निवड करण्याचा पर्याय असेल. बीएमडब्ल्यूजी ३१० आर, जवा पारेक, केटीएम, ड्यूक ३९०, केटीएम आरसी ३९० आणि रॉयल एनफील्ड हिमालयन यापैकी निवडण्यासाठी बाइक पॅकेजमध्ये 5 बाइक्स असतील. त्याचबरोबर गॅझेट्स पॅकेजमध्ये कंपनी अॅपल आयपॅड प्रो (विद पेन्सिल), बोस हेडफोन, हर्मन कार्डन स्पीकर, सॅमसंग गॅलेक्सी वॉच, घरातून काम करण्यासाठी खुर्ची, फायर फॉक्स २७.५ डी सायकलसह अन्य आकर्षक वस्तूचा पर्याय देण्यात आहे.
सदर पॅकेज कंपनीच्या विद्यमान कर्मचार्यांना तसेच जुन्या कर्मचार्यांना देखील उपलब्ध असेल, जर त्याने एखाद्या तंत्रज्ञ तज्ज्ञाची कंपनीमध्ये जाण्याची शिफारस केली असेल आणि त्यांनी सदर सल्ला स्वीकारला असेल तर त्यांना याचा लाभ घेता येईल. त्याशिवाय दुबईत होणाऱ्या आयसीसी पुरूष टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारत पे आपल्या ग्रुपला सामन्यात आनंद घेण्याची संधी देईल.
टेक टीमचे कर्मचारी दुबईमध्ये त्यांच्या आवडत्या टीमला पाठिंबा देताना दिसतील. तसेच कंपनीने आपल्या कर्मचार्यांचे पगार 8 महिन्यांपूर्वी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत पे कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अश्नीर ग्रोव्हर म्हणतात की, आम्ही पुढच्या पिढीसाठी भारतात बँकिंग व्यवस्था तयार करीत आहोत. आमच्या कंपनीत सामील होण्यासाठी आम्ही नवीन तरूणांना आमंत्रित करीत आहोत.