मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेअर बाजारात सध्या चांगला नफा कमावणाऱ्या वेदांता लिमिटेडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आनंदवार्ता आहे. वेदांता लिमिटेड कंपनीच्या मंडळाने प्रति शेअरच्या हिशेबानुसार १३ रुपयांचा एक लाभांश देण्यास मंजुरी दिली आहे. बुधवारी व्यवसायाच्या अखेरच्या क्षणी बीएसई इंडेक्सवर वेदांताचा स्टॉक प्राइज १.८१ टक्के वाढून बंद झाला. सध्या कंपनीच्या शेअरचा भाव ३८७.३५ रुपये आहे. त्याशिवाय वेदांताचे बाजार भांडवल १,४३,९८५.६१ कोटी रुपये आहे.
धातू क्षेत्रातील वेदांता कंपनी सुमारे ४,८३२ कोटी रुपये लाभांश देत आहे. त्यासाठी १० मार्च ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास या तारखेपर्यंत कंपनीच्या प्रत्येक शेअरधारकाला लांभाश मिळणार आहे. अब्जाधीश अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांताने नुकत्याच विलिनीकरण किंवा व्यावसायिक पुनर्रचना करण्याच्या योजना फेटाळून लावल्या होत्या. तसेच कंपनीने सध्याच्या उपलब्ध रचनेत व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्धारही केला होता. कंपनीच्या स्टॉकमध्ये दीर्घकाळ वाढ होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय त्याच्या मूल्यांकनाला लाभांशाचा आधारही मिळणार आहे.