मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना सतत वाढतच जाताना दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने आता मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो स्कूटरचे ३२१५ स्कूटर्स परत मागवल्या आहेत. स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास कंपनी ताबडतोब दुरुस्त करेल, असे ओकिनावाने म्हटले आहे. हा ओकिनावाच्या वाहन तपासणी शिबिरांचा एक भाग आहे
“बॅटरी लूज कनेक्टर किंवा इतर कोणतीही त्रुटी असेल तर तपासली जाणार आहे. तसेच ओकिनावा अधिकृत डीलरशिपवर विनामूल्य दुरुस्ती केली जाईल”, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. दुरूस्तीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक डीलर भागीदारांसोबत काम करत आहे. यासाठी, कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधत आहे. कंपनीचे देशभरात सुमारे पाचशे डीलर्सचे नेटवर्क त्यासाठी तयार केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आगीच्या घटना समोर येत आहेत. अलीकडे जितेंद्र इलेक्ट्रिकच्या सुमारे ४० इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) आग लागली. कारखान्यातून कंटेनरमध्ये ई – स्कूटर नेत असताना हा अपघात झाला. यापूर्वीही ओला आणि प्युअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. २८ मार्च रोजी पुण्यात Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. तसेच Ola S1 Pro या स्कूटरलादेखील आग लागल्याचे समोर आले होते. त्याचवेळी चेन्नईमध्ये प्युअर ईव्ही स्कूटरला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटना पाहता ओकिनावा कंपनीने स्कूटर्स परत मागवल्या आहेत.