इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतीही वस्तू नादुरुस्त झाली किंवा खराब निघाली तर ती परत घेण्यास दुकानदार किंवा विक्रेते टाळाटाळ करतात. तसेच आम्ही त्याला जबाबदार नाही असे सांगत कंपनीकडूनच वस्तू खराब आल्याचे सांगतात. परंतु जर एखादी अत्याधुनिक वाहन नादुरूस्त निघाले तर काय होईल. याचा आपण विचारही देखील करू शकत नाही. आता महिंद्रा, ह्युंदाई पाठोपाठ किया कंपनीनेही त्यांच्या तब्बल ४ लाख कार परत मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
किआ कंपनीनेही तब्बल 4 लाख 10 हजार वाहने परत मागविली आहेत. अपघातादरम्यान या कारमधील एअरबॅग उघडत नसल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात आल्या. परत मागविलेल्या कारमध्ये 2017 आणि 2018 मधील काही फोर्टे ही स्मॉल कार तसेच 2017 ते 2019 मधील सेडोना मिनीव्हॅन आणि सोल स्मॉल एसयूव्ही या कारचा समावेश आहे. यामध्ये सोलच्या इलेक्ट्रिक मॉडेलचाही समावेश आहे. किआने सांगितले की, एअरबॅग कंट्रोल कव्हर मेमरी चिपच्या संपर्कात येऊ शकते. तसेच इलेक्ट्रिकल सर्किट खराब करू शकते. अपघाताच्या वेळी एअरबॅग फुगण्यापासून रोखू शकते. किआने डीलर्सना सॉफ्टवेअर अपडेट करण्यास किंवा बदलण्यास सांगितले आहे. दोषपूर्ण मॉडेल्सच्या मालकांना येत्या 21 मार्चपासून ईमेलद्वारे सूचित केले जाईल.
देशातील आघाडीच्या वाहन उत्पादक महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने गेल्या वर्षी हजारो वाहने परत मागविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच ह्युंदाई कंपनीने देखील 26 हजारांहून अधिक वाहने सदोष कार्यामुळे परत मागवली होती. विंडशील्डच्या समस्येमुळे कंपनीने ही वाहने परत मागवली. कंपनीने यूएसमधील 2020 आणि 2021 एलांट्रा, सांता फे आणि सोनाटा सेडान मॉडेल्सच्या एकूण 26,413 युनिट्ससाठी हे रिकॉल केले आहे.
टेस्लानेही अमेरिका आणि चीनच्या बाजारात विकल्या गेलेल्या 6 लाख 75 हजारहून अधिक कार परत मागवल्या होत्या. अलीकडच्या काही दिवसांत, टेस्लाने यूएस मार्केटमधून एकूण 4,75,318 कार आणि चीनच्या बाजारपेठेतून एकूण 2 लाख कार परत मागवल्या. टेस्ला मॉडेल 3 आणि टेस्ला मॉडेल एस मॉडेल्सच्या ट्रंक आणि फ्रंट हूडमध्ये समस्या होती. या कारचे हे दोन्ही भाग सुरक्षेशी संबंधित असल्याने कंपनीने ते परत मागवणे योग्य मानले. टेस्ला मॉडेल 3 च्या एकूण 356,309 युनिट्स यूएस मार्केटमधून परत मागवण्यात आल्या होत्या. तर टेस्ला मॉडेल एसच्या एकूण 1,19,109 युनिट्स परत मागवण्यात आल्या होत्या. याबाबत कंपनीचे म्हणणे आहे की, टेस्ला मॉडेल 3 मधील 1 टक्के आणि टेस्ला मॉडेल एस कारच्या 14 टक्के सुरक्षेच्या समस्या होत्या आणि त्या लवकरच सोडवल्या जातील.