इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजेशाहीच्या काळात राजे-महाराजे आपल्या विश्वासू आणि खरी निष्ठा दाखवणाऱ्या दरबारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोन्याच्या माळा तसेच अनेक मौल्यवान भेटवस्तू देत होते, हे आपण वाचले, ऐकले आणि पाहिले आहे. खऱ्या निष्ठेचे मोल त्याच काळात होते असे नव्हे, ते आजही दिसून येते. फक्त भेटवस्तू बदलल्या आहेत, भावना मात्र तीच कायम आहे. एवढे सगळे सांगायचे कारण आहे. ते वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
ग्लोबल सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनी किसफ्लो (Kissflow) च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) आपल्या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांची निष्ठा आणि कटिबद्धता ओळखून त्यांचा सन्मान केला आहे. हा सन्मान शाल, श्रीफळ देऊन नव्हे, तर चक्क पाच बीएमडब्ल्यू (BMW 530D) कार देऊन केला आहे. या कारची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक आहे. कोविड-१९ च्या कठीण काळात कंपनीसोबत उभे राहून खरी निष्ठा दाखवल्याबद्दल तसेच कंपनीच्या प्रगतीत अमूल्य योगदान दिल्याबद्दल कंपनीने आपल्या पाच अधिकाऱ्यांना ही भेट दिली आहे.
अधिकाऱ्यांना कार देण्याचा समारंभ गुप्त ठेवण्यात आला होता. अधिकारी आता एका महागड्या लक्झरी कारचे मालक बनणार आहेत, हे त्यांना काही तासांपूर्वीच सांगण्यात आले होते. बीएमडब्ल्यू कार भेट मिळणारे अधिकारी नम्रतेची पार्श्वभूमी असलेले आहेत. कंपनीत रुजू होण्यापूर्वी त्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले होते, अशी माहिती किसफ्लो इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश संबंदम यांनी दिली.
कंपनीलासुद्धा अनेक कठीण प्रसंगातून जावे लागले आहे. कोविड महामारीदरम्यान काही गुंतवणूकदारांनी कंपनी यशस्वीरित्या सुरू राहण्याबद्दल शंका व्यक्त केली होती. पूर्वी खूपच कठीण काळ होता. महामारीदरम्यान कंपनी सुरू राहील की नाही याबद्दल गुंतवणूकदारांना विश्वास नव्हता. गुंतवणूकदारांना आम्ही पूर्ण पेमेंट केले आहे आणि आता ही कंपनी पूर्णपणे खासगी मालकीची बनली आहे. याबद्दल आम्हाला आनंद वाटत आहे, असेही सीईओ संबंदम यांनी सांगितले.