नवी दिल्ली – अधिकारी वर्गाची क्रीडा क्षेत्रातील भरारी आपल्या देशाला नवी नाही. मात्र एखाद्या अधिकाऱ्याने थेट पॅरालिम्पिकपर्यंत मजल मारावी, हे दुर्मिळ आहे. गौतम बुद्धनगरचे जिल्हाधिकारी सुहास एल. वाय. यांची जपानच्या टोकियो शहरात होऊ घातलेल्या पॅरालिम्पिकमध्ये निवड झाल्यामुळे देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
टोकियो येथे बॅडमिंटनमध्ये एकल गटात ते सहभागी होतील. दररोज देशासाठी उत्तम प्रशासकीय आदर्श निर्माण करण्याची संधी त्यांना आहे. पण प्रत्यक्ष मैदानावर देशासाठी पहिल्यांदाच खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे सुवर्णपदक जिंकण्याची जिद्द त्यांनी बाळगली आहे.
आतापर्यंत त्यांनी प्रत्येक क्षेत्रात यश संपादन केले आहे. खेळ असो, अभ्यास असो वा कुठलीही परीक्षा असो. कष्ट घेणे हा त्यांचा मुळ स्वभाव आहे. त्यामुळेच त्यांनी जिथे लाथ मारली तिथे पाणी काढले आहे. खरे तर सुहास हे क्रिकेटपटू होते. पण, आयएएसमध्ये आल्यावर त्यांना बॅडमिंटनची गोडी लागली. त्यांनी आझमगड येथे आयएएसचे प्रशिक्षण घेतले. या शहरात बॅडमिंटनचे राज्य स्तरावरील खेळाडू असल्यामुळे त्यांच्या सहवासात सुहास देखील पूर्णवेळ बॅडमिंटन खेळू लागले.
कोरोनाची जबाबदारी
सुहास दिव्यांग असले तरीही कोरोना काळात त्यांच्याकडे गौतम बुद्धनगर येथील जबाबदारी सोपविण्यात आली. तडफदार कामासाठी आणि धडाडीसाठी ते प्रसिद्ध आहेत. यापूर्वी त्यांनी आझमगड, जौनपूर, प्रयागराज आदी जिल्ह्यांमध्ये काम केले आहे. २०१९ ला प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्याच्या वेळी ते जिल्हाधिकारी होते.
कामासोबत खेळात माहीर
सुहास मूळचे कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्याचे आहेत. त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळताना खेळातही स्वतःला तयार केले. त्यांची पत्नीसुद्धा प्रशासकीय सेवेत आहे. सुहास यांनी यापूर्वी २०१६ मध्ये एशियन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण, २०१८ मध्ये जकार्तामध्ये कांस्य पदक पटकावले आहे.