कोरोना परिस्थितीमुळे आपण सामान्य जीवन जगू शकत नाहीये. मास्क लावणे, शारिरीक अंतर राखणे यासारखे नियम, हे नियम राहिले नसून, ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. जगासह देशभरात सतर्कता बाळगली जात आहे. अगदी चहाप्रमाणे ताकसुद्धा फुकून प्यायची ही वेळ आहे. त्यामुळे नवनवे नियम लागू करणे आणि ते स्वीकारणे गरजेचे झाले आहे. भविष्यात परदेशात जाताना तुम्हाला पासपोर्टसह बोर्डिंग पास, सुटकेस पासपोर्टप्रमाणे व्हॅक्सिन पासपोर्ट (डिजिटल लसीकरण प्रमाणपत्र) बाळगणे आवश्यक राहणार आहे. परदेशात गेल्यावर तुम्हाला विलगीकरणात राहण्याची गरज भासू नये यासाठी हा सगळा खटाटोप आहे.
परदेशात याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे. चीन आणि जपानने आपापले प्रमाणपत्र जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. ब्रिटेनमध्ये गेल्या आठवड्यात प्रवासाच्या नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अॅपला अपडेट करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकांच्या लसीकरणाची स्थितीची सत्यता पडताळली जाणार आहे.
युरोपिय युनियनसुद्धा अशाच प्रकारचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहे. यामध्ये लसीकरणाची स्थिती आणि संसर्गातून बरे झालेल्यांची स्थिती याची माहिती दिली जाणार आहे. याच प्रमाणपत्राच्या आधारे संबंधितांना युरोपिय युनियनच्या देशात प्रवास करता येणार आहे.
ईयूच्या प्रमाणपत्रावर एक क्यू आर कोड असेल, या कोडला अधिकारी स्कॅन करतील. त्याद्वारे संबंधित प्रवाशाचे लसीकरण आणि संसर्ग झाला आहे की नाही याबाबतची स्थिती समजू शकणार आहे.
लसीकरणाच्या सत्यता पडताळणासीठी एक केंद्रीयकृत आंतरराष्ट्रीय सत्यता पडताळणी व्यवस्था नसणे हे सर्वात मोठे आव्हान देशांसमोर आहे. अनेक देशांनी एकत्रितरित्या काम करणे खूरच आव्हानात्मक आहे. गोपनीयता आणि लसीकरणाच्या नावावर भेदभाव होत असल्याच्या प्रकरणांमुळे हे आव्हान अधिक गडद झाले आहे. कोरोनावरील उपचार आणि संक्रमित लोकांना ट्रेस करण्यासाठी अनेक देश आपापले अॅप चालवित आहेत. अशा स्थितीत लसीकरण पासपोर्ट एक डिजिटल कागदपत्र ठरणार आहे.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना परदेशात भ्रमण करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राला अनिवार्य करण्याच्या बाजूने नाही. मात्र स्मार्ट लसीकरण प्रमाणपत्राच्या संदर्भात अंतरिम दिशानिर्देश जारी करण्याची तयारी डब्ल्यूएचओ करत आहे.