मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांत विविध कंपनीच्या इ स्कूटरला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. काही दिवसांपूर्वी अशी एक घटना पुणे येथे घडली आणि त्याचा व्हिडिओ वायरल झाला. या पार्श्वभूमीवर ओला इलेक्ट्रिक कंपनीने 1,441 ई-स्कूटर परत मागवले आहेत. दरम्यान, प्रेझ प्रो स्कूटरनेही ३२१५ स्कूटर्स परत मागविण्याचा निर्णय काही दिवसापूर्वीच घोषित केला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना आग लागण्याच्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील २६ मार्चला लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास सुरू असून प्राथमिक तपासात ही एक वेगळी घटना असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कंपनी पुन्हा एकदा ई-स्कूटरची तपासणी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने पुढे सांगितले की, या स्कूटर्सची आमच्या अभियंत्यांकडून चाचणी घेतली जाईल. मात्र सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही या स्कुटर परत मागवित असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि इंधन आयातीवर होणार सर्वात मोठा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकार इ स्कुटरच्या निर्मितीकडे पाहते.
प्रेझ प्रो स्कूटरचाही निर्णय
देशातील इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना सतत वाढतच जाताना दिसत आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक दुचाकी कंपन्यांपैकी एक असलेल्या ओकिनावा ऑटोटेकने आता मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या प्रेझ प्रो स्कूटरचे ३२१५ स्कूटर्स परत मागवल्या आहेत. स्कूटरच्या बॅटरीमध्ये काही दोष असल्यास कंपनी ताबडतोब दुरुस्त करेल, असे ओकिनावाने म्हटले आहे. हा ओकिनावाच्या वाहन तपासणी शिबिरांचा एक भाग आहे
“बॅटरी लूज कनेक्टर किंवा इतर कोणतीही त्रुटी असेल तर तपासली जाणार आहे. तसेच ओकिनावा अधिकृत डीलरशिपवर विनामूल्य दुरुस्ती केली जाईल”, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. दुरूस्तीमध्ये कोणतीही गैरसोय होणार नाही याची खात्री करण्यासाठी इलेक्ट्रिक टू व्हीलर उत्पादक डीलर भागीदारांसोबत काम करत आहे. यासाठी, कंपनी स्वतः ग्राहकांशी संपर्क साधत आहे. कंपनीचे देशभरात सुमारे पाचशे डीलर्सचे नेटवर्क त्यासाठी तयार केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून आगीच्या घटना समोर येत आहेत. अलीकडे जितेंद्र इलेक्ट्रिकच्या सुमारे ४० इलेक्ट्रिक वाहनांना (EVs) आग लागली. कारखान्यातून कंटेनरमध्ये ई – स्कूटर नेत असताना हा अपघात झाला. यापूर्वीही ओला आणि प्युअर ईव्हीच्या स्कूटरला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. २८ मार्च रोजी पुण्यात Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागली होती. तसेच Ola S1 Pro या स्कूटरलादेखील आग लागल्याचे समोर आले होते. त्याचवेळी चेन्नईमध्ये प्युअर ईव्ही स्कूटरला आग लागल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटना पाहता ओकिनावा कंपनीने स्कूटर्स परत मागवल्या आहेत.