नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने आरोग्य विम्यात आता मोठा बदल केला आहे. विमाधारकांसाठी हा नियम अंमलात आणण्यात येणार आहे. या नियमांची पुर्तता न करणाऱ्या विमाधारकांना विम्याचा घेताना काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. १ नोव्हेंबरपासून विमाधारकांसाठी KYC तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे विमाधारकाला विम्याचा दावा करताना केवायसी कागदपत्रे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
नवीन नियमामुळे विमाधारकाला दाव्याचा निपटारा करताना आणि तो मंजूर करताना कसलीही अडचण येणार नाही. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. तसेच सध्या नॉन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना केवायसीचा तपशील सादर करणे ही ऐच्छिक बाब आहे. परंतु एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या दाव्यासाठी केवायसी दस्तावेज आवश्यक आहे. त्यामध्ये पत्ता व ओळखपत्राचा समावेश आहे. आरोग्य विम्याचा हप्ता हा प्रामुख्याने वय आणि विम्याची रक्कम, आरोग्य व्यवस्थापन आणि आरोग्यदायी सवयी यावर अवलंबून असतो.
विशेष म्हणजे केवायसी प्रक्रियेचा फायदा ग्राहकाला आणि विमा कंपनीला तसेच नियामक व विकास प्राधिकरणाला डेटा बेस तयार करण्यासाठी होणार आहे. यामुळे ग्राहकाचा पॉलिसी रेकॉर्ड जतन करता येईल. या माध्यमातून विमाधारकाचे ई-इन्शुरन्स खाते तयार करण्यात येणार आहे. ई-केवायसीच्या मदतीने हे खाते लवकर तयार होऊन ग्राहकांना त्याचा वापर करता येईल. याठिकाणी ग्राहक त्याच्या सर्व प्रकारच्या पॉलिसीची अपडेट पाहू शकेल.