मनिष कुलकर्णी, मुंबई
देशात डिजिटल आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने एक मसुदा सादर केला आहे. त्याअंतर्गत मोबाईल बँकिंगशी संबंधित एसएमएस वर आधारित यूएसएसडी (USSD) सेवा मोफत करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. त्यासाठी आतापर्यंत प्रति यूएसएसडी सेशनच्या हिशेबानुसार ५० पैसे आकारले जातात. ट्रायकडून मोबाईल बेस्ड बँकिंग आणि पेमेंट सेवेसाठी प्रति यूएसएसडी सेशनला शून्य शुल्क आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामुळे मोबाईलवरून बँकेतील बॅलेंस तपासण्यासारख्या सेवा पूर्णपणे मोफत होतील.
USSD सेवा म्हणजे काय
यूएसएसडी म्हणजे अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस डाटा होय. यूएसएसडी सेवेद्वारे मोबाईलमधून मेसेजच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक जाणून घेणे तसेच पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यासाठी मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. इंटरनेट सेवेशिवाय युजर *999# द्वारे बँक बॅलेंससह अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा पाहू शकतो. ही सेवा विशेषतः फिचर फोनसाठी असते. ग्रामीण भागात या सेवेचा जास्त वापर केला जातो. हे एसएमएस फोनमध्ये स्टोअर होऊ शकत नाही.
म्हणून हा निर्णय
ट्रायच्या माहितीनुसार, डिजिटल सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी यूएसएसडी शुल्क समाप्त करायला हवेत. त्यामुळे ट्रायने प्रति यूएसएसडी सेशनसाठी शून्य शुल्क आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. जर यूएसएसडी शुल्क मसुद्याला मंजुरी मिळाली, तर डिजिटल व्यवहारात वाढ होण्याची शक्यता आहे. ट्रायने या प्रस्तावावर ८ डिसेंबरपर्यंत सल्ले मागविले आहेत. यासंदर्भात सल्ला देण्यासाठी आरबीआयने एका समितीची स्थापना केली आहे. आरबीआयच्या समितीनेसुद्धा यूएसएसडी शुल्क हटविण्याचा सल्ला दिला आहे.