मुंबई – शासकीय आणि खासगी बँकांमध्ये सध्याच्या काळात मोठी स्पर्धा सुरु आहे. बँक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी बँक वेगवेगळ्या योजना आणत आहेत. विशेषत: खासगी बँका हा स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी ग्राहकांना विविध सोयी सुविधा पुरवत असून काही बँकांनी सभासदांच्या व्याजदरात देखील वाढ केली आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने वेगवेगळ्या कालावधीसाठी ठेव रकमेवरील व्याजदरात वाढ केली आहे. वयोमान 60 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना 19 महिने आणि एक दिवस ते 24 महिन्यांच्या कालावधीसाठी ठेव रकमेवर 6.6 टक्के व्याजदर दिला जाईल. त्याच वेळी, बँक 12 महिन्यांच्या कालावधीसाठी 6.5 टक्के व्याज देईल. बँक यापूर्वी या मुदतीच्या ठेव रकमेवर 6 टक्के व्याज देत होती. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या ग्राहकांना नवीन दर 9 डिसेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. तर बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याज देणार आहे.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने 1 लाख रुपयांची गुंतवणूक 24 महिन्यांसाठी 7.35 टक्के दराने केल्यास त्याला 1,15,681 रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकतो. उज्जीवन बँक ही त्रैमासिक, सहामाही, वार्षिक आणि मॅच्युरिटी व्याज देय पर्यायांना अनुमती देते. मुदतपूर्व बंद आणि आंशिक पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे.