विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला एक मेपासून सुरुवात होत आहे. त्यासाठी मंगळवारी नोंदणीप्रक्रिया सुरू झाली. परंतु प्रक्रिया सुरू होताच कोविन अॅपवर एकच गर्दी झाल्याने लोकांच्या मनात लशीबाबत काहीच शंका नसल्याची सकारात्मक बाब दिसली. परंतु एकाच दिवशी लाखो लोकांनी नोंदणीचा प्रयत्न केल्याने कोविन अॅप क्रॅश झाले. त्यामुळे नोंदणी करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यातही नोंदणी झालेल्या लोकांना लसीकरणाचा दिवस आणि वेळ सापडू शकला नाही. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण १ मे पासून सुरू होणार की नाही, याबाबत मोठी संभ्रमावस्था आहे.
किमतीवरून वाद
एक मेपासून १८ ते ४५ वर्षांवरील सर्व लोकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या टप्प्यात लस उत्पादक कंपन्यांकडून राज्य सरकार आणि खासगी रुग्णालये थेट लस खरेदी करून लोकांचे लसीकरण करणार आहेत. लसीच्या किमतीवरून सुरू असलेला वाद आणि राज्य सरकारांच्या भूमिकांमुळे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
नोंदणीची सुरुवात
तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी नोंदणीप्रक्रिया सुरू झाली. कोविन अॅपवर अचानक झालेल्या गर्दीमुळे अॅप क्रॅश झाले. राज्यांना १८ ते ४५ वर्षांच्या लोकांना लसीकरण केंद्राची माहिती कोविन अॅपवर उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्यांनी सांगितले.
हे सांगावे लागणार
अॅपवर लसीकरण केंद्र आणि वेळेची माहिती देण्यासाठी लसीकरण केंद्रांवर किती डोस उपलब्ध आहेत याची माहितीही राज्य सरकारांना द्यावी लागणार आहे. राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेचे सीईओ आर एस शर्मा म्हणाले, की लसीकरण केंद्रांवर गर्दीची शक्यता लक्षात घेऊन नोंदणी करतानाच लस घेण्याचा दिवस आणि वेळ ठरवणे गरजेचे आहे.
हळूहळू माहिती मिळणार
राज्य सरकार लसीकरण केंद्र आणि उपलब्ध डोसची संख्या अपडेट करत जातील, तशी नोंदणीची प्रक्रिया वाढत जाईल. येत्या काही दिवसात संपूर्ण प्रक्रिया सुरळीत होईल, असा आशावाद आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला.
खासगी कंपन्यांना अडथळे नाही
१८ ते ४५ वर्षांच्या लोकांना नोंदणी करताना अनेक अडथळे येत असले तरी खासगी क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या कर्मचार्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य नाही. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयांशी टायअप करून थेट लसीकरण करता येऊ शकणार आहे.
कोविशिल्ड स्वस्त
लशींच्या किमती कमी करण्याचे केंद्र सरकारने निर्देश दिल्यानंतर कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत स्थानिक लस उत्पादक कंपन्यांना किंमत घटवण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या कोविशिल्ड लशीची किंमत शंभर रुपयांनी कमी केली आहे. कोविशिल्ड आता ४०० ऐवजी ३०० रुपये प्रतिडोस मिळणार आहे. त्यामुळे दुसरी लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकवरही किंमत कमी करण्याचा दबाव वाढला आहे.