नाशिकरोड – नाशिक – पुणे महामार्गवरील शिंदे गावा जवळ असलेल्या नायगाव रोड वरील राजस्थान लिकर ली. कंपनी गोडाऊनमधील सुमारे २७ लाख रुपये किंमतीच्या दारूच्या बॉक्स चोरट्यांनी शनिवारी रात्री लंपास केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरट्यांनी गोडाऊनवरील वाचमनला मारहाण केली. त्यानंतर त्याला बांधून ठेऊन ही धाडसी चोरी केली.
नायगावरोड वरील लोहिया कंपाऊंड मध्ये राजस्थान लिकर लिमिटेड कंपनीचे गोडाऊन असून या ठिकाणी ही धाडसी चोरी चोरट्यांनी केली. शनिवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास लोहिया कंपाऊंड मधील वाचमन मयूर शांताराम मगर हा त्याच्या खोलीत झोपलेला असतांना तीन तोंड झाकलेले अनोळखी व्यक्ती त्याच्या जवळ आले. त्यांनी दारूचे गोडाऊन कुठे आहे ? याबाबत विचारणा केली. मगर यांनी माहीत नसल्याचे सांगताच त्यानी मारहाण केली. त्यानंतर शेजारी असलेल्या कापडी चादर फाडून तीच्या पट्टानी मगर यास बांधून टाकले. यावेळेस त्याचा मोबाईल तसेच कंपाऊंडच्या गेटची चावी सुध्दा चोरट्यांनी हिसकवून घेतली. या चोरीची तक्रार राजस्थान लिकर ली. कंपनीचे व्यवस्थापक दिपक दत्तात्रय नाईक यांनी नाशिकरोड पोलिस स्थानकात दिली आहे.
या फिर्यादीत चोरट्यांनी गोडाऊनचे शटरचे दोन्ही कुलुप लोखंडी टॉमीने तोडून गोडाऊन मधील सिग्राम कंपनीचे रॉयल स्टग ब्रँडचे वेगवेगळ्या साईजचे ३७० बॉक्स मधील सुमारे २६ लाख ९४ हजार २०३ रुपये किंमतीचे दारू आयशर गाडीत भरून चोरून नेल्याचे म्हटले आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस उपायुक्त विजय खरात, साह्ययक पोलीस आयुक्त समीर शेख, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, पोलीस निरीक्षक गणेश न्याहादे, सहायक पोलीस निरीक्षक विलास शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.