केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांची माहिती
नवी दिल्ली – देशभरातून येणारी वाढती मागणी लक्षात घेऊन, टॉसिलीझूमॅबच्या 45000 कुप्यांचा अतिरिक्त पुरवठा राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आला आहे. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांनी ही घोषणा केली.
30 एप्रिल 2021 रोजी 400 एमजी क्षमतेच्या 9,900 इंजेक्शनचा उपलब्ध साठा विविध राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना वितरित करण्यात आला.
https://twitter.com/PIB_India/status/1392152186776276994?s=20
रॉशे कंपनीने 80 एमजी क्षमतेच्या 50,000 कुप्या भारतातील कोविड रुग्णांसाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून 10 मे 2021 रोजी सद्भावनापूर्वक दान केल्या आणि भारत सरकारने त्या राज्ये/ केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयांना वितरित केल्या.
यानंतर 80 एमजी क्षमतेच्या 45,000 कुप्या व्यापारी तत्त्वावर 11 मे 2021 रोजी भारतात आयात करण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालय व औषधनिर्माण विभागाने 11 मे 2021 रोजी त्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित केल्या. 45,000 पैकी 40000 कुप्या वापरण्याचा निर्णय राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांवर सोपविण्यात आला असून, त्या-त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील सरकारी तसेच खासगी रुग्णालयांतील रुग्णांना त्याचा उपयोग होऊ शकणार आहे. हे औषध उपलब्ध करून देणाऱ्या यंत्रणेविषयी राज्य सरकारांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रसिद्धी करावी, असा सल्ला राज्यांना देण्यात येत आहे- जेणेकरून, गरजू रुग्ण आणि खासगी रुग्णालयांना त्याची माहिती मिळू शकेल व राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांना त्यासाठी संपर्क साधने त्यांना शक्य होईल. तसेच, या औषधाची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचनाही राज्यांना देण्यात येत आहेत. हे औषध कोविड-19 रुग्णांसाठी अतिशय न्यायोचित पद्धतीने आणि राष्ट्रीय क्लिनिकल व्यवस्थापन प्रोटोकॉलनुसारच वापरले जाईल, याची खबरदारीही राज्यांनी घ्यायची आहे.
टॉसिलीझूमॅबचे अतिरिक्त वितरण केल्यामुळे कोविड रुग्णांसाठी ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होऊन, या महामारीचा सामना करण्यासाठी सरकारकडून सुरु असलेल्या प्रयत्नांना भक्कम जोड मिळू शकणार आहे.