मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अॅन्ड कयाकिंग” राज्य संघटनेच्या दोन कार्यकारिणी अस्तित्वात असल्याने राज्यस्तरीय प्राविण्य प्राप्त खेळाडूंना ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी लाभ देण्यात येणार नसल्याचे क्रीडा व युवक सेवा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले.
शासकीय व निमशासकीय सेवेत खेळाडूंना 5% आरक्षण असून, कनोईंग व कायाकिंग हा खेळ ऑलिंपिक, एशियन व कॉमनवेल्थ या स्पर्धांमध्ये खेळला जात असल्याने या खेळाला शासकीय/निमशासकीय सेवेत 5% खेळाडू आरक्षण देण्यात येते.
कनोईंग व कायाकिंग या खेळाच्या “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अॅन्ड कयाकिंग” राज्य संघटनेच्या दोन कार्यकारणी अस्तित्वात असल्याने खेळाडूंचे नुकसान होत आहे. राज्यात संबंधित खेळाची एकच संघटना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. जेणेकरुन संघटनेमार्फत आयोजित अधिकृत स्पर्धांमधील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासनामार्फत विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय राहील. यामुळे “महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनोईंग अॅन्ड कयाकिंग” राज्य संघटनेतील वाद संपुष्टात येऊन एकच अधिकृत कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत. धर्मादाय आयुक्त यांच्याकडून महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन व भारतीय कनोईंग आणि कायाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत या खेळाच्या एकाच अधिकृत राज्य कार्यकारणीस मान्यता मिळेपर्यंत कनोईंग व कायाकिंग खेळाच्या आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्राविण्य प्रमाणपत्रे 5 टक्के खेळाडू आरक्षण अंतर्गत पात्र करण्यात येणार नाही.
भारतीय कनोईंग आणि कयाकिंग असोसिएशन यांच्या मार्फत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंची प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल. वरील बदलाची नोंद कनोईंग व कायाकिंग या खेळातील खेळाडूंनी घ्यावी, असे आवाहन आयुक्त, क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य श्री. ओम प्रकाश बकोरिया यांनी केलेली आहे.