पुणे – आजपासून ऑक्टोबर महिना सुरू होताच काही नियम बदलले आहेत. या बदलांचा सर्वसामान्यांपासून विशेष नागरिकांपर्यंत सर्वांवर परिणाम होणार आहे. यामध्ये बँकांचे चेकबुक, ऑटो डेबिट पेमेंट, एलपीजी सिलिंडरचे दर आणि निवृत्तिवेतनाशी संबंधित नियमांचा समावेश आहे. कोणकोणते बदल झाले आहेत यावर एक नजर टाकूया.
जुने चेकबूक कालबाह्य
एक ऑक्टोबरपासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (ओबीसी), युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) आणि अलाहाबाद बँकेचे जुने चेकबुक कालबाह्य झाले आहेत. या बँकांचे दुसर्या बँकांमध्ये विलिनीकरण झाले आहे. त्यामुळे खातेदारांचे खाते क्रमांक, चेकबुक, आयएफएससी व एमआरसीआर कोड बदलले आहेत. आता एक ऑक्टोबरपासून खातेधारकांना नवे चेकबुक घ्यावे लागणार आहे.
निवृत्ती वेतन नियम
जिवीत डिजिटल प्रमाणपत्राशी संबंधित नियम बदलले आहेत. देशातील ८० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या निवृत्तिवेतनधारकांना देशातील सर्व मुख्य टपाल कार्यालयाच्या जीवन प्रमाण केंद्रांत डिजिटल हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्याची मुभा असेल. त्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे.
म्युच्युअल फंड गुंतवणूक
शेअर बाजार नियामक संस्था सेबीने म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, असेट अंडर मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड हाउसमध्ये काम करणार्या सर्व कनिष्ठ कर्मचार्यांना नियम लागू होणार आहे. १ ऑक्टोबर २०२१ पासून सेएमएससी कंपन्यांच्या कनिष्ठ कर्मचार्यांना आपल्या वेतनाचा दहा टक्के भाग म्युच्युअल फंडाच्या युनिटमध्ये गुंतवावा लागणार आहे. १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने वेतनाचा २० टक्के भाग गुंतवावा लागणार आहे.
ऑटोडेबिट पेमेंट पद्धत
क्रेडिट-डेबिटकार्डच्या पेमेंटशी संबंधित नियमांमध्ये १ तारखेपासून बदल होत आहेत. क्रेडिट आणि डेबिटकार्डने होणार्या ऑटोडेबिट पेमेंटचा नवा नियम लागू केला जाणार आहे. त्याअंतर्गत ग्राहकांना माहिती दिल्याशिवाय बँक तुमच्या खात्यातून पैसे कापू शकणार नाहीत. पैसे कापण्याआधी बँक तुम्हाला माहिती देणार आहे. ग्राहकांनी परवानगी दिल्यानंतरच बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे डेबिट करू शकेल.