विशेष प्रतिनिधी, मुंबई
इंधन आणि खाद्यपदार्थांच्या वस्तू महाग झाल्यानंतर आता फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनसारख्या घरात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या किमती १५ जुलैपासून वाढणार आहेत. तांबे, कॉपर, अॅल्युमिनिअम, पोलाद (कमोडिटी)च्या किंमती आणि उत्पादनाचा खर्च वाढल्याने कंपन्यांकडून जुलैच्या मध्यापासून या उपकरणांच्या किंमती १० ते १५ टक्के वाढविण्याची शक्यता आहे. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये कंपन्यांकडून किंमती वाढविण्यात आल्या होत्या.
देशात उन्हाळा सुरू होताच फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनसारख्या उपकरणांची मागणी वाढते. परंतु बहुतांश ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आल्याने घरगुतीसह आवश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री बंद आहे. लॉकडाउन उघडल्यानंतर विक्री वाढू शकते. परंतु पुरवठा बाधित झाल्यामुळे मागणी पूर्ण करता येणार नाही. त्याचा परिणाम थेट किंमतींवर होणार आहे, असे कंपन्यांचे म्हणणे आहे.
यावर्षी जागतिक पातळीवर कमोडिटीच्या किंमती वाढल्या आहेत. सीआरबी इंडेक्समध्ये एप्रिलमध्ये कमो़डीटी ७० टक्के वाढला आहे. त्याचा परिणाम ग्राहकांवर होणार आहे, असे मोतीलाल ओसवाल फायनांशिअल सर्व्हिसेसच्या अहवालात म्हटले आहे,
तयार असलेल्या वस्तूंवर २० टक्के आयात शुल्क लावल्यामुळे परदेशांमधील उत्पादित वस्तूंची खरेदी महाग झाली आहे. त्यामुळे बाजारातील वस्तूंच्या तुटवड्याला भरून काढण्यासाठी किमती वाढविणे हाच एक पर्याय आहे, असे बजाज इलेक्ट्रिकल्सचे मुख्य वित्तीय अधिकारी अनंत पुरंदरे यांनी सांगितले.
लॉकडाउन उठविल्यानंतर वस्तूंची मागणी पाहता किमती वाढवून ग्राहकांवर भार टाकला जाणार आहे. ग्रामीण भागात सरकारी प्रयत्न आणि आर्थिक स्थिती चांगली झाल्याने गावांमध्ये वीज पोहोचली आहे. परिणामी घरगुती उपकरणांची मागणी वाढू शकते, असे केअर रेटिंगच्या एका अहवालात म्हटले आहे.
ग्राहकांवर बोजा