नवी दिल्ली – देशात दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक प्रमाणात आढळत असल्याने तिस-या लाटेचा धोका टळलेला नाही. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरणावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. परंतु त्याआधीच देशातील आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान उभे ठाकले आहे. उत्तर प्रदेशपासून केरळपर्यंतच्या राज्यात वेगवेगळ्या तापांचे रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये निपाह विषाणू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात डेंग्यू, दिल्लीमध्ये विषाणूजन्य आजार आणि बिहारमध्ये मलेरियाच्या प्रादुर्भावामामुळे तापाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने चिंता वाढली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये अजूनही ९५ टक्क्यांपर्यंत रुग्णालयातील खाटा रिकाम्या नाहीत. यामध्ये ६० ते ७० टक्क्यांपर्यंत रुग्ण ताप किंवा व्हायरलने बाधित आहेत. नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स)चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, की तापाचे रुग्ण वाढले आहेत. लहान मुलांमध्ये एन्फ्लुएंझा संसर्ग पाहायला मिळत आहे. स्क्रब टायफस आणि लेप्टोस्पिरोसिससारखे जीवाणूंचा संसर्ग (बॅक्टेरियल इन्फेक्शन) सुद्धा कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या मुलांना जीवघेणा ठरू शकतो. तापामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते, की डासांच्या प्रादुर्भाव वाढल्याने त्यासंबंधित आजार वाढले आहेत. आता आम्हाला कोरोनाशिवाय इतर आजारांशी दोन हात करण्याचासाठी तयार राहावे लागणार आहे.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही)च्या संशोधक डॉ. प्रज्ञा यादव सांगतात, यूपीमध्ये काही जिल्ह्यात पसरणा-या गूढ तापाच्या रुग्णांचे जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये आम्हाला डेंगी विषाणूचा डी-२ स्ट्रेन आढळला आहे. तो खूपच घातक आहे. महाराष्ट्र आणि यूपीशिवाय दिल्लीमधूनही काही नमुने मागविण्यात आले आहेत. तेथील रुग्णांमध्ये व्हायरल ताप आल्यानंतर दीर्घकाळ खोकला आणि कफ असल्याच्या तक्रारी मिळत आहेत. अनेक रुग्णांना १०२ अंशाहून अधिक ताप येत आहे. अनेक कारणांमुळे ताप येऊ शकतो. कोरोनामध्येही असे लक्षण दिसते. परंतु ताप आल्याचे खरे कारण ठाऊक असणे आवश्यक आहे. तेव्हाच योग्य उपाचार दिले जाऊ शकतात, असे डॉ. यादव म्हणाल्या.
दिल्लीत एम्स फुल्ल
दिल्लीत कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी तयारी करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी सर्व रुग्णालये ८० ते ९० टक्के भरलेली आहेत. यूपी, बिहार, मध्यप्रदेश. राजस्थानसह अनेक राज्यांमधून दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. एम्स व्यवस्थानाच्या माहितीनुसार, त्यांच्याकडे आता क्षमतेहून अधिक रुग्णांचा भार आहे. त्यामुळे नव्या रुग्णांना सफदरजंग रुग्णालयात पाठविले जात आहे. सफदरजंग रुग्णालयातही औषधांचा तुटवडा जाणवत असून अनेक विभाग फुल असल्याचे सांगण्यात आले आहे.