विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
कोरोनामुक्त झाल्याचा छुपा दावा करणारा चीन येत्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरू शकतो, असा अंदाज एका संशोधनानंतर व्यक्त करण्यात आला आहे. यात चीनसोबत जपान, फिलीपाईन्स आणि थायलंडचाही समावेश आहे.
जगभरात कोरोनाचा कहर झाला. केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात व्यवसाय बुडाले, नोकऱ्या गेल्या. पण अचानक चीनसारख्या देशांनी एकही रुग्ण नसल्यासारखे चित्र निर्माण केले. मात्र आता जगाच्या नजरेतून वाचण्याची त्यांची शक्यता नाही. युनिव्हर्सिटी आफ कॅलिफोर्निया, बर्कले, पॉलिटेक्निक, युनिव्हर्सिटी आफ मिलान आणि न्युझीलंड येथील मेसी युनिव्हर्सितीच्या संशोधकांची एक टीम यावर काम करीत होती. त्यांनी जपानमधील काही भाग, उत्तर फिलीपाईन्स आणि चीनमधील शांघायच्या दक्षीणेकडे वन जमिनीचे तुकडे पडल्यामुळे हॉट स्पॉटची भिती व्यक्त केली आहे. तर इंडो–चायना आणि थायलंडच्या काही भागांमध्ये पशुधन उत्पादनात वाढ झाल्यामुळे संक्रमण वाढण्याची भिती व्यक्त केली आहे. एकूणच जगात जमिनीच्या वापरात बदल झाले आहेत. त्यात जंगलांचे क्षेत्र कमी करणे, कृषी क्षेत्र वाढवणे आणि पशुधन केंद्रीत उत्पादन वाढवणे यांचा समावेश आहे.
केवळ एकच व्हेरियंट घातक
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आता केवळ एकच व्हेरियंट घातक राहिल्याचे म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट भारतातून ओसरल्याची बातमी दिलासा देणारी आहे. भारतात आढळलेल्या कोरोना विषाणूच्या व्हेरियंटमध्ये केवळ डेल्टा नावाचा व्हेरियंट घातक राहिला आहे, असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. इतर दोन स्ट्रेनचा धोका कमी झालेला आहे.