विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता हळूहळू कमी झाला आहे. मात्र लसीकरणही संथगतीने सुरू आहे. लस उपलब्ध नसणे हे त्यामागचे मुख्य कारण आहे. मात्र आता जगभरातील अनेक देश भारतीयांना लस देण्यासाठी उत्सुक आहेत आणि यात अमेरिका, जपान, रशिया, कॅनडा आघाडीवर आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये भारतातील लसीचा तुटवडा दूर होणार, हे निश्चित आहे.
रशियाच्या स्पुटनिक लसीची निर्मिती भारतात सुरू झालेली आहे. अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसोबतही चर्चा सुरू आहे. यात अमेरिकेतील दिग्गज लस निर्माते फायझर व मॉडर्ना हे देखील लवकरच सामील होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर लसीच्या संशोधनाचे कार्य करणाऱ्या आणखी सहा आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतातील लस निर्माता कंपन्यांसोबत संपर्कात आहेत. यात अमेरिका, कॅनडा, यूरोप आणि जपानमधील कंपन्यांचा सहभाग आहे. अर्थात प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष लस उपलब्ध होण्यासाठी काही महिने प्रतिक्षा करावी लागेल.
सीरम इन्स्टीट्यूट व्यतिरिक्त या कंपन्या बायोलॉजिकल ई, पॅनेसियासारख्या मोठ्या कंपन्यांसोबत चर्चा करीत आहे. देशात भारत बायोटेक, झायडस कॅडिला आणि बायोलॉजिकल ई ची एक लस स्वदेशी आहे, हे महत्त्वाचे. औषध निर्माण क्षेत्राचे म्हणणे आहे की अमेरिकेतील लस निर्माता कंपन्या जास्तीचे आर्डर घेण्याच्या स्थितीमध्ये नाहीत. या कंपन्यांच्या क्षमतेचा विस्तार होण्याकरिता कमीत कमी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.
संपूर्ण लस भारतात
भारत ज्या विदेशी कंपन्यांसोबत लसीसाठी चर्चा करीत आहे, त्यात केवळ कच्चा माल आयात करण्याचा प्रस्ताव नाही, तर संपूर्ण लसच भारतात तयार करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती केंद्र सरकारचे विदेश सचिव हर्ष श्रृंगला यांनी दिली आहे. संपूर्ण लस भारतात तयार करण्यासाठीच जगभरातील कंपन्यांना आपण आमंत्रण दिले आहे, असेही ते म्हणाले.
सध्या निर्यात नाही
संपूर्ण जगाला लस देण्याची क्षमता आहे, असा दावा केल्यानंतर भारतातच तुटवडा निर्माण झाला. मात्र सध्या भारतातून लस निर्यात होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पण त्यामुळे जगभरातील ९१ देशांमधील लस पुरवठ्याला अडथळा निर्माण होण्याचा धोका आहे.