विशेष प्रतिनिधी, मुंबई
बदल हा आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. काही बदलांचा सकारात्मक तर काही बदलांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होत असतात. देशात एक जूनपासून आपल्या आयुष्यावर परिणाम करणारे काही बदल होणार आहेत. त्यापैकी एक म्हणजे गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तसेच काही बँकांचे IFSC Code बदलण्याची शक्यता आहे. प्राप्तीकर भरणार्या लोकांसाठी काही बदल महत्त्वाचे आहेत. चला तर जाणून घेऊयात काय काय बदल होऊ शकतात ते.
गॅस सिलिंडरच्या किंमती
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत एक जूनपासून बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या १ आणि १५ तारखेला एलपीजी दराची आढावा घेतात. सध्या दिल्लीत १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ८०९ रुपये आहे. त्यासोबतच १९ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीतही बदल होऊ शकतात.
हॉलमार्किंग लांबणीवर
सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग १ जूनपासून लागू होणार नाही. दागिने व्यावसायिकांच्या मागणीमुळे या निर्णयाला १५ जूनपर्यंत लांबणीवर टाकण्यात आले आहे. ब्युरो ऑफ इंडिया स्टँडर्डचे (बीआयएस) महासंचालक प्रमोद तिवारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे. नियमांना लागू करण्यासाठी येणार्या अडचणींवर ही समिती तोडगा काढणार आहे. त्यानंतर नियमांना १५ जूनपासून लागू करण्यात येणार आहे.
प्राप्तीकर नवे संकेतस्थळ
प्राप्तीकर विभाग ७ जूनपासून प्राप्तीकर भरण्यासाठी नवे संकेतस्थळ लाँच करणार आहे. १ ते ६ जूनपर्यंत सध्याच्या संकेतस्थळावर कोणतेच काम होणार नाही. www.incometaxindiaefiling.gov.in या जुन्या संकेतस्थळाचे रूपांतर www.incometaxgov.in या संकेतस्थळात होणार आहे.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदा बँकेच्या धनादेश व्यवहार करण्याच्या नियमांमध्ये १ जूनपासून बदल होणार आहे. बँकेकडून पॉझिटिव्ह पे चेक सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे धनादेशाद्वारे होणारी फसवणूक कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. २ लाख किंवा त्याहून अधिकचा व्यवहार करायचा असल्यास ग्राहकांना संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर बँक माहितीची पडताळणी करेल. फसवणुकीचा संशय आल्यास तो व्यवहार थांबविला जाणार आहे.