मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादा चित्रपट लोकप्रिय होण्यामागे कलाकारांची प्रचंड मेहनतही कारणीभूत असते. यासाठी कलाकारांना भूमिकेत जीव ओतावा लागतो. वेळप्रसंगी आपल्या रोजच्या जीवनात आमूलाग्र बदल करावा लागतो. तेंव्हा ती भूमिका चाहत्यांना अगदी आपलीशी वाटते. एवढे सगळे प्रयत्न केल्यानंतर कलाकारांना देखील आपला अभिनय कसा झाला असेल, तो प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल की नाही, याची उत्सुकता असतेच. तरीही काही कलाकार असे आहेत, जे आपलेच चित्रपट पहात नाहीत. मग ते चित्रपट हिट होवोत की फ्लॉप, या कलाकारांना त्याने काहीही फरक पडत नाही.
अशा कलाकारांमध्ये करीना कपूर – खान हिचा समावेश होतो. स्वतःचा कोणताच चित्रपट करीना पहात नाही. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात करण जोहरने ही माहिती दिली. करीना आणि आमीर खान या कार्यक्रमात आले होते. तेंव्हा करीना स्वतःचे चित्रपट पहात नसल्याचे समोर आले. त्यावर ती म्हणाली की, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लगेच मी चित्रपट पहात नाही. कारण त्यावेळी एक अस्वस्थता असते. पण नंतर कधीही मी तो पाहते, असे करीना सांगते.
करीना प्रमाणेच शाहरुख खान हा देखील आपले चित्रपट पहात नाही. त्याचं म्हणणं असतं की त्याचे चित्रपट हे त्याच्या मुलांप्रमाणे असतात. त्यामुळे त्यांत डावं – उजवं करणं त्याला कठीण जातं. शिवाय नंतर जरी शाहरुखने त्याचे चित्रपट पाहिले तरी तो पूर्ण चित्रपट सलग पहात नाही तर तुकड्यातुकड्याने पाहतो.
बोमन इराणी हे देखील सर्वांचे लाडके अभिनेता आहेत. पण तेही आपले चित्रपट बघत नाहीत. मुन्नाभाई, 3 इडियट्स यांसह अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना नेहमीच भावतात. त्यांना मात्र स्वतःला पडद्यावर बघायला आवडत नाही. ते म्हणतात की, मी स्वतःच स्वतःचा टीकाकार आहे. मी माझे चित्रपट पाहिले की, त्यात काही न काही खोड काढत राहतो. आणि यापेक्षाही चांगलं आपण करू शकलो असतो असं वाटत राहतं. त्यामुळे मी चित्रपट पहातच नाही.
या सगळ्यांच्या यादीत एक तरुण कलाकार देखील आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानचा भाचा इमरान खान. माझे चित्रपट मी पाहिले की, मी यापेक्षा अजून चांगलं करू शकलो असतो, असं मला वाटत राहतं, म्हणूनच मी माझे चित्रपट पहात नसल्याचे तो सांगतो.
These Celebrity not watch own Movie
Entertainment Bollywood