मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBIL) आणि लक्ष्मी विलास बँक (LVB) खातेदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस बँक इंडिया लिमिटेड (DBIL) मध्ये विलिनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे लक्ष्मी विलास बँकेच्या सर्व शाखांचे IFSC आणि MICR कोड बदलण्यात आले आहेत. नवीन कोड २५ ऑक्टोबर २०२१पासून सक्रिय असले तरी जुना IFSC कोड २८ फेब्रुवारी २०२२पासून बदलला जाईल.
डीबीएस बँक इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या प्रकाशनानुसार, १ मार्च २०२२पासून ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS द्वारे पैशांच्या व्यवहारांसाठी नवीन DBS IFSC कोड वापरावा लागेल. DBIL ने पुढे सांगितले की “ग्राहकांना ईमेल आणि एसएमएसद्वारे प्रत्यक्ष पत्रे पाठवून शाखांमधील बदलांबद्दल माहिती देण्यात आली होती. त्यांना त्यांचे रेकॉर्ड, आवर्ती पेमेंट वेळेत अद्ययावत करण्याची आणि नवीन IFSC कोड मिळविण्याची विनंती करण्यात आली होती.” खातेधारकांनी त्यांच्याकडे असलेले चेकबुक २८ फेब्रुवारी २०२२पूर्वी बदलले पाहिजेत. या तारखेनंतर, जुना MICR कोड असलेले कोणतेही चेक स्वीकारले जाणार नाहीत. १ नोव्हेंबर २०२१पासून नवीन चेकबुक नवीन MICR कोडसह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
येथे नवीन कोड पहा
नवीन IFSC कोड्स / MICR कोडची संपूर्ण यादी https://www.lvbank.com/view-new-ifsc-details.aspx वर पाहता येईल. ९४ वर्ष जुन्या लक्ष्मी विलास बँकेचे मूळ सिंगापूरचा समूह असलेल्या डीबीएस बँकेच्या भारतीय शाखेत भारत सरकारच्या विशेष अधिकाराखाली आणि बँकिंग नियमन कायदा ४५ अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रस्तावानुसार विलीनीकरण करण्यात आले आहे.
डीबीएस बँक इंडियाचे उपक्रम
या महिन्याच्या सुरुवातीला डीबीएस बँक इंडियाने घोषणा केली की, भारतभरातील छोट्या डेअरींमध्ये डिजिटायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी स्टॅलॅप या आघाडीच्या डेअरी-टेक स्टार्टअपसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीचा अप्रत्यक्षपणे सध्या २० हजार शेतकर्यांना आणि नजीकच्या भविष्यात सुमारे १ लाख दुग्ध उत्पादक शेतकर्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.