मुंबई – २०२१ हे वर्ष सरत आले आहे. नव्या वर्षाला काही दिवसातच सुरुवात होईल. येणारे नवीन वर्ष आपल्यासाठी काही बदलही घेऊन येणार आहे. यामध्ये आर्थिक बदलांचाही समावेश आहे. १ जानेवारी २०२२ मध्ये आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. या नियमांमध्ये बँकेतून पैसे काढण्यापासून ते जमा करण्यापर्यंत, डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधितही नियम आहेत. या नियमांविषयी आज आपण जाणून घेऊया.
एटीएममधून पैसे काढणे महाग
नव्या वर्षापासून ग्राहकांना मोफत एटीएम व्यवहार मर्यादा पार केल्यावर अधिक पैसे अदा करावे लागणार आहेत. जूनमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) बँकांनी एक जानेवारी २०२२ पासून एटीएममधून मोफत मासिक पैसे काढण्यावर एका मर्यादेनंतर शुल्क वाढविण्याला मंजुरी दिली होती. आता मोफत व्यवहाराची मर्यादा संपल्यानंतर तुम्हाला काही शुल्क अदा करावे लागणार आहे. आरबीआयच्या दिशानिर्देशांनुसार अॅक्सिस बँक किंवा इतर बँकांच्या एटीएममधून मोफत मर्यादेच्या वर आर्थिक व्यवहार करण्यावर २१ रुपये आणि जीएसटी द्यावा लागणार आहे.
पोस्ट पेमेंट बँकेतून पैसे काढणे महाग
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेधारकांना एक मर्यादेनंतर रोख रक्कम काढण्यासाठी तसेच भरणा करण्यासाठी शुल्क अदा करावे लागणार आहे. हा नियम १ जानेवारीपासून लागू होणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तीन प्रकारचे बचत खाते उघडले जाऊ शकते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या माहितीनुसार, मूळ बचत खात्यातून प्रत्येक महिन्यात दर महिन्यात चार वेळा मोफत रोख रक्कम काढता येणार आहे. परंतु त्यानंतर रक्कम काढताना किमान २५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. मूळ बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
डेबिट आणि क्रेडिट कार्ड
एक जानेवारी पासून डेबिट आणि क्रेडिट कार्डने आर्थिक व्यवहार करण्याच्या पद्धतीत बदल होणार आहे. ऑनलाइन पेमेंट सुरक्षित बनविण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने याच्याशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. आता ऑनलाइन पेमेंट करताना तुम्हाला १६ आकड्यांचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड क्रमांकासह कार्डवरील संपूर्ण माहिती नोंदवावी लागणार आहे. म्हणजेच ऑनलाइन शॉपिंग आणि डिजिटल पेमेंट करताना व्यावसायिक संकेतस्थळ किंवा अॅप तुमच्या कार्डची सविस्तर माहिती जतन करून शकणार नाही. जी माहिती आधीपासूनच जतन करण्यात आली आहे ती हटविण्यात येणार आहे.