मुंबई – अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक बँकांमध्ये तुमचे बँक खाते असेल, तर तुम्हाला नवे चेकबुक घ्यावे लागणार आहेत. या बँकांचे चेकबुक १ ऑक्टोबर २०२१ पासून अवैध ठरणार आहेत. त्यासाठी ग्राहकांना संबंधित बँकांमध्ये अर्ज करावे लागतील. अलहाबाद बँकेचे इंडियन बँकेत तसेच ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकमध्ये विलिनीकरण झाले आहे.
इंडियन बँकेने अलाहाबाद बँकेच्या ग्राहकांना नव्या इंडियन बँकेच्या चेकबुकसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून इंडियन बँकेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, नव्या चेकबुकची ऑर्डर देऊन अलाहाबाद बँकेचे ग्राहक इंडियन बँकेच्या सेवेचा आनंद घेऊ शकणार आहेत. १ऑक्टोबर २०२१ पासून जुने चेकबुक स्वीकारले जाणार नाहीत. अलाहाबाद बँकेचे ग्राहक मोबाइल बँकिंग किंवा बँक शाखेच्या माध्यमातून इंडियन बँकेचे नवे चेकबुक प्राप्त करू शकणार आहेत.
पंजाब नॅशनल बँकेनेसुद्धा याच पद्धतीने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांना ट्विटर हँडलवरून पीएनबी पासबुकसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इओबीसी आणि इयूएनआयच्या जुने चेकबुक १ ऑक्टोबरपासून बंद होणार असून, संबंधित बँकांच्या ग्राहकांनी पीएनबीचे चेकबुक घ्यावे, असे आवाहन ट्विटरवर केले आहे. आपल्या शाखेतून नवे चेकबुक प्राप्त करावे अथवा एटीएम, आयबीएस किंवा पीएनबीच्या माध्यमातून अर्ज करावा. सर्व ग्राहकांनी अपडेटेड IFSC आणि MICR च्या नव्या पीएनबी चेकबुकचा वापर करून आर्थिक व्यवहार करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.