नवी दिल्ली – २०२२ मध्ये देशातील नागरिकांना 5G ची भेट मिळणार आहे. 5G च्या परीक्षणाचा अखेरचा टप्पा सुरू आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत हे परीक्षण पूर्ण होण्याची शक्यता आहे. तशी माहिती दूरसंचार विभागाने दिली आहे. देशातील १३ शहरांमध्ये सर्वात प्रथम 5G सेवेला सुरुवात होणार आहे. या १३ शहरांची यादी दूरसंचार विभागाने प्रसिद्ध केली आहे.
दूरसंचार विभागाच्या अधिकृत पत्रकानुसार, एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन आयडियासह दूरसंचाल सेवा पुरवणार्या कंपन्यांनी गुरुग्राम, बंगळुरू, कोलकाता, मुंबई, चंडीगढ, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि गांधीनगरमध्ये ५ जी चे परीक्षणचे सेटअप लावण्यात आले आहे. या महानगर आणि मोठ्या शहरांमध्ये पुढील वर्षी सर्वात आधी ५ जी सेवा सुरू होणार आहे. परीक्षण प्रकल्पामध्ये २२४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
दूरसंचार विभाग डॉटच्या माहितीनुसार, मार्च-एप्रिल २०२२ मध्ये 5G स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये आरक्षित मूल्य, बँड प्लॅन, ब्लॉक साइझ, स्पेक्ट्रम क्वांटमच्या संदर्भात दूरसंचार नियामक संस्थेकडून (ट्राय) शिफारस मागण्यात आली आहे. नियामक संस्थेने सर्व कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे.
८ संस्थांशी भागिदारी
२०१८ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 5G परीक्षण प्रकल्पांसाठी दूरसंचार विभागाने ८ संस्थांसोबत भागिदारी केली होती. हे परीक्षण ३१ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. या संस्थांमध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळुरू, सोसायटी फॉर एप्लॉयड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (एसएएमईईआर) आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी (सीईडब्ल्यूआयटी) या संस्थांचा समावेश आहे.