नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दुरुस्तीच्या कामामुळे गंगापूर धरण व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा शनिवार २० ऑगस्ट रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवार २१ ऑगस्टचासकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक पाणी पुरवठा ( यांत्रिकी ) विभागाने केले आहे.
मनपाचे मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील रेमण्ड सबस्टेशन गोंदे येथून एक्सप्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी ३३ के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. सदर सब स्टेशनमधील दुरुस्ती कामे करणेकरीता शनिवार २० ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपावेतो पॉवर सप्लाय बंद ठेवणेत येणार आहे. तसेच मनपाचे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन येथील दुरुस्ती कामे करणे आवश्यक असल्याने शनिवार २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ .०० ते सायंकाळी ६.०० पावेतो मनपाचे सर्व जलशुध्दीकरण केंद्र येथून संपूर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे म्हटले आहे.