मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला एक महिना पूर्ण झाला तरी मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री आणि बिनखात्याचे उपमुख्यमंत्री असाच कारभार सध्या सुरू आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असे ठरलेले उत्तर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने दिले जात आहे. तेलंगणातदेखील अशी परिस्थिती उद्भवली होती. मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली दोनच मंत्र्यांचे सरकार ६६ दिवस कार्यरत होते. महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याने मुख्यमंत्री शिंदे हा विक्रम मोडतात की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही महिन्यात सत्तांतरावरुन राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेतील आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. आता या सत्ता स्थापनेला महिना उलटला असला तरी विस्ताराला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शिंदे यांचा शनिवारी आणि रविवार असा दोन दिवस नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांचा दौरा होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सुतोवाच शिंदे यांनी केले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने सध्या सारा कारभार हा मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच आहे. सरकारचे प्रमुख या नात्याने त्यांना सर्व खात्यांमध्ये मुख्यमंत्र्यांना लक्ष घालता येते. उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक पद नाही. राजकीय सोयीसाठी हे पद निर्माण करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपमुख्यमंत्र्यांना अधिकार नसतात. खातेवाटप झालेले नसल्याने फडणवीस हे कायदेशीरदृष्टय़ा बिनखात्याचे उपमुख्यमंत्री आहेत. शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी सरकारवर भाजप किंवा फडणवीस यांचाच पगडा आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. परंतु नियमानुसार खातेवाटप झाले नसल्याने फडणवीस यांच्याकडे अधिकृतपणे कोणत्याही खात्याचा पदभार सध्या तरी नाही.
शिंदे व फडणवीस सरकारचा विस्तार होत नसल्याने विरोधकांकडून या सरकारवर सातत्याने टिका करण्यात येत आहे. दोनच मंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका सुरू झाली आहे. घटनेत मंत्रिमंडळाची किमान संख्या ही १२ असावी अशी तरतूद आहे. पण किमान संख्येचे मंत्रिमंडळ किती काळात अस्तित्वात आले पाहिजे, अशी काहीच ठोस तरतूद नाही. हिमाचल प्रदेशमध्ये १० जणांच्या मंत्रिमंडळाच्या कारभारावरून करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने खर्च कमी होत असल्यास कमी आकारमानाचे मंत्रिमंडळ असल्यास बिघडले कुठे, असे निरीक्षण नोंदविले होते.
तेलंगणात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला २०१८ मध्ये पुन्हा सत्ता मिळाली. तेव्हा मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि मोहंमद अली हे दोनच मंत्री होते. चंद्रशेखर राव यांच्यासह दोघांचा शपथविधी १३ डिसेंबर २०१८ रोजी झाला होता, तर मंत्रिमंडळाचा विस्तार १९ फेब्रुवारी २०१९ रोजी म्हणजे तब्बल ६६ दिवसांनी झाला होता. यामुळेच शिंदे व फडणवीस सरकार तेलंगणाचा विक्रम मोडणार की तत्पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार, अशीच आता चर्चा रंगू लागली आहे. तर लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असे ठामपणे मुख्यमंत्री शिंदेंकडून सांगण्यात येत आहे.
Then Record will set on the name of Chief Minister Eknath Shinde