नवी दिल्ली – तुम्ही जर नव्या व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे थेट रेल्वेच भाड्याने घेण्याचा. हो हा काही विनोद नाही तर हे खरं आहे. खुद्द रेल्वेमंत्र्यांनीच तशी माहिती दिली आहे. रेल्वेकडून देशभऱात १-२ नव्हे तर तब्बल १९० रेल्वे गाड्या या भाड्याने दिल्या जाणार आहेत. त्यामुळे वेळ न दवडता ही संधी नक्की साधा.
देशातील सार्वजनिक सेवांचे परिचालन सुस्थितीत आणण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच खासगीकरणाचे कवाडे खुले करून दिले आहेत. हवाई वाहतूक असो अथवा रेल्वे असो केंद्राने खासगी कंपन्यांना आमंत्रित केले आहे. टाटा समुहाने नुकतेच हवाई वाहतुकीसाठी एअर इंडियाला खरेदी केले आहे. आता रेल्वेसेवेचे संचालन करण्याची संधी खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या थिमवर रेल्वेचे संचालन करून पर्यटनाला आधार देण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालयाकडून सुरू आहे.
देशात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने खासगी क्षेत्राला थिमवर आधारित रेल्वेगाड्यांचे संचालन करण्याची संधी दिली आहे. ‘भारत गौरव ट्रेन’ या नावाने धावणार्या या विशेष खासगी रेल्वेचे भाडे, खाणेपिणे आणि इतर सुविधेचे पॅकेज खासगी कंपन्या निश्चित करतील. यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास दोनशे रेल्वेंचे संचालन करण्याचा प्रस्ताव आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत भारत गौरव ट्रेनच्या संचालनाची घोषणा केली. या निर्णयामुळे पर्यटन क्षेत्रात चांगले प्रोत्साहन मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या या पुढाकाराने देशातील सांस्कृतिक वारशाचे दर्शन करण्याची संधी मिळणार आहे. भारत गौरव ट्रेनचे संचालन करण्यासाठी खासगी क्षेत्रासह आयआरसीटीसी आणि ओडिशा, राजस्थान, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांनी रस दाखविला आहे.
ते म्हणाले, यासाठी संपूर्ण योजना तयार करण्यात आली आहे. सर्व पक्षकारांसोबत चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या आहेत. या योजनेसाठी रेल्वेच्या एकूण ३,०३३ बोगी तयार आहेत. यापूर्वीच्या पहिल्या टप्प्यात एकूण १९० रेल्वेंचे संचालन करण्याचा प्रस्ताव आहे. रेल्वेचे भाडे, परतफेड, प्राधान्याच्या गोष्टी, पार्किंग स्थळे, खाणे-पिणे, हॉटेल आणि इतर सुविधांवर चर्चा झाली आहे. टूर ऑपरेटर्सनी यामध्ये रस दाखवला असून, पुढाकार घेतला आहे.
रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले, की एका थिमवर आधारित विशेष रेल्वेगाडीचे भाडे संबंधित कंपनी निश्चित करणार आहे. परंतु पॅकेजचे संपूर्ण भाडे तर्कसंगत असेल. या टूर पॅकेजमध्ये चार-पाच वस्तू ,रेल्वे प्रवास, जाण्याचे ठिकाण, टॅक्सीचे साधन, हॉटेल आणि खाणेपिणे आदींचा समावेश आहे. या रेल्वेच्या वेळेबाबत विचारले असता, ते म्हणाले की या रेल्वे सामान्य रेल्वेसारख्या नसतील. त्यामुळे या रेल्वेंना विशेष सवलत दिली जाईल. नियमांमध्ये लवचिकता असेल.
रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकारामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. सध्या १५ खासगी कंपन्यांनी उत्सुकता दाखविली आहे. देशात रेल्वेच्या प्रवासामुळे पर्यटनाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. रेल्वे विभागाला याचे सारथ्य करण्याची इच्छा आहे. भारत गौरव ट्रेनच्या आत आणि बाहेर जाहिराती लावण्यास परवानगी असेल. प्रत्येक रेल्वेमध्ये गार्ड व्हॅनसह एकूण १४ ते २० बोगी असतील.