नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सीबीएस परिसरातील बाल सुधारलयासमोर २७ किलो चांदी चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी रात्री पावणेबारा वाजता घडली आहे. २७ किलो चांदीच्या पार्सलसह अॅक्टिव्हा गाडी असा एकूण १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन हे चोरटे पसार झाले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. या बाबत समजलेली हकीकत अशी की, जय बजरंग कुरिअर अँड पार्सल सर्व्हिसेस कंपनीत कुरियर बॉय असलेले अमितसिंग सिकरवार हे चांदीचे पार्सल पुणे आणि औरंगाबादला पोहोचवण्यासाठी आपल्या दोन मित्रासोबत अॅक्टिव्हा गाडीवरून ठक्कर बाजार बस स्थानककडे निघाले होते. त्यावेळेस त्यांची गाडी सीबीएस परिसरातील बाल सुधारलयासमोर आल्यानंतर चोरट्यांनी डाव साधला. या घटनेत एक चोर मोटारसायकलवरून तर दोन चोर दुस-या गाडीवरुन आले. त्यांनी अमितसिंग यांची गाडी अडवली. त्यानंतर त्याला मारहाण केली. त्यानंतर एकाने अमितसिंगच्या डोक्याला पिस्टल लावताच अमितसिंगचे साथीदार घाबरून पळून गेले. त्यानंतर २७ किलो चांदीच्या पार्सलसह अॅक्टिव्हा गाडी असा एकूण १२ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले.