पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्योतिषाकडून मुहूर्त काढून १ कोटी ७ लाखाची चोरी करणा-या पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. या आरोपींकडून ७६ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चार महिन्यापूर्वी बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील देवकातेनगर येथे महिलेचे हातपाय बांधून ही चोरी करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या चोरीचा शोध लावला. त्यामुळे मुहूर्त काढून चोरी करणा-या या चोरांचा डाव त्यांच्या अंगलट आला.
या घटनेत पोलिसांनी सचिन अशोक जगधने, रायबा तानाजी चव्हाण, रवींद्र शिवाजी भोसले, दुर्योधन धनाजी जाधव आणि नितीन अर्जुन मोरे या पाच जणांना अटक केली आहे. हे सर्व चोर एमआयडीसीतील मजूर कामगार आहे. या चोरांना सागर गोफणे हे जमीन विक्रीचा व्यवसाय करत असून त्यांच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी अगोदर मुहूर्त काढला. या मुहूर्ताच्या वेळी त्यांनी चार महिन्यापूर्वी रात्री ८ वाजता ही चोरी केली.
सागर गोफणे यांच्या पत्नी तृप्ती या त्यांच्या लहान मुलांसह घरात असताना या चार चोरट्यांनी घराच्या कंपाऊंड भिंतीवरुन आत प्रवेश केला. त्यानंतर तृप्ती गोफणे यांना मारहाण करुन त्यांचे हातपाय बांधून त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. त्यानंतर घरातील एक कोटी सात लाख २४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. त्यात ९५ लाख ३० हजार रुपये रोख होते. ही चोरी करण्यापूर्वी या चोरांनी फलटण तालुक्यातील आंदरुड येथील ज्योतिषी रामचंद्र वामन चव्हाण यांच्याकडे मुहूर्त काढला होता. त्याचे मार्गदर्शनही या चोरांनी घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे.
Theft of 1 Crore 7 Lakhs by extracting Muhurat from Astrology
Pune Baramati Crime Theft Police Arrest