इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे अशांनी चोरीच्या प्रकरणात अडकावं म्हणजे कमालच झाली. अर्थात हे परकरण जुनेच आहे. पण आता त्याची चर्चा अधिक होत आहे. कारण देशाचे केंद्रीय गृहराज्य मंत्री निशिथ प्रामाणिक यांनी या प्रकरणात न्यायालयात आत्मसमर्पण केलं आहे. त्यामागे त्यांचा जो काही उद्देश्य असेल, पण चोरीच्या प्रकरणात गृहराज्यमंत्र्यांनी आत्मसमर्पण करणं चर्चेला वाव देणारी घटना आहे.
केंद्रात अमित शहा हे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री पद पश्चिम बंगालचे निशिथ प्रामाणिक यांच्याकडे आहे. ते कुचबिहारचे खासदार आहेत. देशात कुठलीही चोरीची घटना घडू देत, दरोडा पडू देत किंवा गँगवॉर होऊ दे, त्याची माहिती गृहखात्याला द्यावीच लागते. अर्थात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचा प्रश्न नाही, पण एखाद्या बड्या नेत्याशी संबंधित गुन्हेवार्ता असेल तर त्याची दखल केंद्रात घेतलीच जाते. निशिथ प्रामाणिक यांच्याशी संबंधित चोरीच्या प्रकरणाचीही माहिती केंद्राला असावीच. त्यामुळे भविष्यातील अडचणी आणि कटकट दूर करण्यासाठी त्यांनी आत्मसमर्पण केले. या प्रकरणातील सुनावणीसाठी ते अलीपूरद्वार न्यायालयात हजर होते. न्यायालयाने दिलेलेल्या वेळेच्या दोन दिवस आधीच ते आले आणि आत्मसमर्पण केलं. भविष्यात या प्रकरणावरील सुनावणीदरम्यान त्यांनी व्यक्तिशः हजर होण्याची गरज पडू नये, यासाठी त्यांनी आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पण केल्यामुळे व्यक्तिशः हजर राहण्यापासून त्यांना सूट देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
२००९ मध्ये झालेल्या एका चोरीच्या प्रकरणात ते आरोपी असून या प्रकरणाची सुनावणी अलीपूरद्वार न्यायालयात सुरू आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये न्यायालयाने केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने या वॉरंटला स्थगिती तर दिली, पण १२ जानेवारीपूर्वी अलीपूरद्वार न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रामाणिक आज न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर झाले.
‘मला गोवण्यात आलं’
चोरीच्या प्रकरणात अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. तिथे माझं नाव कुठेच नव्हतं. पण राजकीय षडयंत्रापोटी मला या प्रकरणात गोवण्यात आलं, अशी भूमिका निशिथ प्रामाणिक यांनी स्पष्ट केली.
Theft Case Union Minister Nishit Pramanik in Court
Legal BJP