मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव तालुक्यातील अस्तगांव येथून ट्रॅक्टरमधून कांदे विक्रीसाठी लासलगाव बाजार समितीमध्ये घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात होऊन तरुण शेतकऱ्याचा ट्रॅक्टर खाली दबून जागीच मृत्यू झाला. अजय नानासाहेब उगले (वय,३०) असे मृत तरुण शेतक-यांचे नाव आहे. हा अपघात मनमाड – लासलगाव रोडवरील रायपूर शिवारात आज शुक्रवारी दुपारी झाला.
मनमाड पासून जवळच असलेल्या अस्तगांव येथून अजय शेतकरी कांदे घेऊन विक्रीसाठी प्रथम मनमाड बाजार समितीच्या आवारात आला होता. मात्र येथे कांद्याला कमी भाव असल्यामुळे त्याने वडिलांशी चर्चा करून लासलगांव बाजार समितीत जादा भाव मिळेल या अपेक्षेने तातडीने लासलगांव मार्केटला कांद्याचा भरलेला ट्रॅक्टर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. हा टॅक्टर घेऊन जात असतांना चांदवड तालुक्यातील रायपूर-निंबाळे शिवारात खड्डा चुकवतांना हा अपघात झाला. अजयच्या हातातून स्टेअरिंग हातातून सुटल्याने तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरच्या चाकाखाली तो आला व दबून त्याचा मृत्यू झाला. यावेळी स्थानिकांनी अजयला मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान याबाबतची घटना वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी मयत शेतकऱ्यावर अस्तगांव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी सर्व थरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मयत अजय उगले याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार असून मनमाड बाजार समितीचे कर्मचारी नानासाहेब राजाराम उगले यांचे ते चिरंजीव होते.
The young farmer died on the spot