विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशभरात कोरोना लसीकरणाची मोहीम सुरू असून अनेक राज्यात या मोहीमेला आता वेग आला आहे. १८ ते ४४ आणि ४५ ते ६० तसेच त्यापुढील वयाचे ज्येष्ठ नागरिक यांना ही लस देण्यात येत आहे. साधारणता कोशील्ड किंवा कोवॅक्सिन या लसीचे प्रत्येकी दोन डोस केंद्र सरकारमार्फत मोफत देण्यात येत असून रशियातून आलेली स्पुटनिक लस देखील खासगी रुग्णालयांत उपलब्ध झाली आहे. त्यापाठोपाठ आता पुढील महिन्यात जॉन्सनची लस देखील भारतात उपलब्ध होणार असल्याने लसीकरण मोहिमेला आणखी वेग येणार आहे. विशेष म्हणजे या लसीचा एकच डोस घ्यावा लागणार असल्याने सर्वांनाच फायदा होणार आहे.
पुढील महिन्यात कोरोना विषाणूंविरूद्ध जॉन्सनची ही लस आपल्या देशाला मिळण्याची अपेक्षा आहे. अमेरिकन औषधनिर्माण संस्था जॉन्सन अॅन्ड जॉन्सनची हीलस भारतात सुरुवातीला ही लस अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असेल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तीचा एकच डोस पुरेसा आहे. असोसिएशन ऑफ हेल्थकेअर प्रोव्हाईडर (इंडिया) ही संस्था लस थेट मिळावी यासाठी अमेरिकन कंपनीशी चर्चा करीत आहे. या एक डोसच्या लसीची किंमत भारतात २५ डॉलर म्हणजेच अंदाजे १८०० रुपये असेल. तसेच ही लस भारतासारख्या देशासाठी अतिशय अनुकूल आहे. ती ठेवण्यासाठी कमी तापमानात रेफ्रिजरेटरची आवश्यकता भासणार नाही. देशातील आरोग्य सुविधांची स्थिती लक्षात घेता ही लस टीयर -२ शहरांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
दरम्यान, जॉन्सन आणि जॉन्सन देशातील उत्पादन प्रक्रिया आणि वैशिष्ट्यांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधीच सरकारशी चर्चा करीत आहेत. भारतात क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यासाठी कंपनीने एप्रिलमध्येच सरकारकडे संपर्क साधला होता. आता नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कंपनीला देशात चाचण्या घेण्याची गरज नाही. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीजीआय) च्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, आपत्कालीन वापरास केवळ यूएस ड्रग कंट्रोल च्या मान्यतेच्या आधारेच देशात मान्यता देण्यात येईल. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (डब्ल्यूएचओ) म्हणण्यानुसार, जॉन्सनची ही लस कोरोना विषाणूच्या सौम्य आणि मध्यम संसर्गाविरूद्ध ६६.३ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तर अत्यंत गंभीर संसर्ग विरूद्ध ७६.३ टक्के प्रभावी आहे.