नवी दिल्ली –लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या (एनटीएजीआय) शिफारशींच्या आधारे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज गरोदर महिलांना कोविड 19 प्रतिबंधक लस द्यायला मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे गरोदर महिलांना कोविड 19 प्रतिबंधक लस घेण्याबाबत योग्य पर्याय निवडता येईल. सध्याच्या राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना हा निर्णय कळविण्यात आला आहे.
भारताच्या राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमात लसीकरण, सार्वजनिक आरोग्य, रोग नियंत्रण आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी तज्ञांच्या शिफारसी समाविष्ट केल्या आहेत. वैज्ञानिक आणि महामारी विज्ञानाच्या पुराव्यांच्या आधारे, हा कार्यक्रम व्यावसायिक, आरोग्य आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करून, तसेच अत्यंत असुरक्षित घटकांचे संरक्षण करून देशाची आरोग्य सेवा बळकट करण्यास प्राधान्य देतो. आतापर्यन्त गरोदर महिला वगळता सर्व गट कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी पात्र होते. आता, जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत गरोदर महिलांनाही सामावून घेण्यात आले आहे.
गर्भधारणेदरम्यान कोविड -19 संसर्ग झाल्यास गर्भवती महिलांचे आरोग्य झपाट्याने बिघडू शकते आणि त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका असतो आणि यामुळे गर्भावरही परिणाम होऊ शकतो असे अभ्यासातून असे दिसून आले आहे. या विषयी तज्ञांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अभ्यास केला आहे , जो असे सूचित करतो की गरोदर महिलांना कोविड संसर्ग झाल्यास इतर महिलांच्या तुलनेत त्यांना आजार गंभीर होण्याचा धोका असतो. तसेच कोविड -19 संसर्ग झालेल्या गरोदर महिलांमध्ये नऊ महिने पूर्ण होण्याआधीच प्रसूतीचा तसेच नवजात शिशुला आजार होण्याचा धोका असतो . याव्यतिरिक्त, तज्ञांनी अधोरेखित केले की गरोदरपणात आधीच अस्तित्त्वात असलेल्या सह-व्याधी , मातेचे वाढलेले वय आणि बॉडी मास निर्देशांक अधिक असणे देखील कोविड 19 ची तीव्रता वाढवू शकतात.
लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाने गरोदर महिलांचे लसीकरण करण्याची शिफारस केली आहे. कोविड -19 साठी लस प्रशासनावरील राष्ट्रीय तज्ञ गटानेही एकमताने याची शिफारस केली आहे. याव्यतिरिक्त, गरोदर महिलांसाठी कोविड लसीकरण विषयी राष्ट्रीय स्तरावरील सल्लामसलतीचे आयोजन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केले होते. गरोदर महिलांना लसीकरण करण्याच्या एनटीएजीआयच्या शिफारशीचे त्यांनी एकमताने स्वागत केले. या सल्लामसलत बैठकीत एफओजीएसआय, राज्य सरकारचे प्रतिनिधी, सीएसओ, स्वयंसेवी संस्था, विकास भागीदार संस्था , तांत्रिक तज्ञ इत्यादी व्यावसायिक संस्थांचा समावेश होता.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या शिफारसी स्वीकारल्या आहेत आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्याबाबत मार्गदर्शक सूचना, वैद्यकीय अधिकारी आणि आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशन किट आणि सामान्य लोकांसाठी आयईसी सामुग्री राज्य / केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणीसाठी सज्ज करण्यासाठी तयार केली आहे. लसीकरण पर्याय निवडणाऱ्या गरोदर महिला कोविन अॅपवर नोंदणी करू शकतात किंवा नजीकच्या कोविड लसीकरण केंद्रात (सीव्हीसी) वॉक-इन द्वारे किंवा शासकीय किंवा खाजगी कोविड लसीकरण केंद्रात लस घेऊ शकतात. कोविड –19 लसीकरणाची प्रक्रिया व कार्यपद्धती राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमांतर्गत 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटाच्या लाभार्थ्यांप्रमाणेच असेल.