अहमदनगर – कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतली. प्रधानमंत्री मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची व्यापक अंमलबजावणी आदींची माहिती पंतप्रधानांना दिली. त्यावेळी त्यांनीही समाधान व्यक्त केले.
प्रधानमंत्री मोदी यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी थेट संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी तसेच मुंबईहून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. विविध राज्यातील निवडक जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यावेळी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा मुख्यालयातून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, जिल्हा प्रशासनासह पोलीस, आरोग्य, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद तसेच इतर सर्व यंत्रणांच्या सहकार्य आणि समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, जिल्ह्यातील कोरोनाच्या पहिल्या लाटेत केलेले प्रयत्न आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे म्हणणे अतिशय मन:पूर्वक ऐकले.
केंद्र आणि राज्य शासनाने जारी केलेल्या आदेशांची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, ब्रेक दी चेन आदेशानुसार दैनंदिन जीवन विस्कळीत न होता बाधितांना शोधण्याची मोहीम याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. कोरोना चाचणी, लसीकरण, खासगी डॉक्टर/हॉस्पिटल यांच्याकडून आकारले जाणारे शुल्क रुग्णांना परत करण्यासाठी अशा विविध बाबींसाठी नोडल अधिकारी नेमल्याने कामात गती आली. त्याचा सकारात्मक परिणाम यंत्रणेवर झाला. ग्रामपातळीवरील यंत्रणा कार्यरत झाल्याचे ते म्हणाले.
ऑक्सिजन उपलब्धता: जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लान्ट, बाहेरुन आणण्यात येणारा ऑक्सिजन सुरक्षितरित्या पोहोचावा यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केली. प्रत्येक ऑक्सिजन प्लान्टवर स्वतंत्र उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी समन्वय अधिकारी म्हणून नेमला. खासगी हॉस्पिटलकडून ऑक्सिजनची मागणी नोंदवून तेथील रुग्णसंख्येप्रमाणे त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येऊ लागल्याने उपलब्ध ऑक्सिजन आणि मागणी हे बर्यापैकी स्थिर करण्यात प्रशासनाला यश आले. राज्य शासनाच्या ऑक्सिजन निर्मिती प्लान्टसाठी प्रोत्साहन देण्याच्या धोरणाची वेगाने अंमलबजावणी करुन जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्लान्टची उभारणी सुरु करण्यात आली असल्याचे त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना सांगितले.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण पातळीवरील यंत्रणा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हे ओळखून ग्रामपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या ग्रामस्तरीय अधिकार्यांशी थेट संवाद सुरु केला. याशिवाय तेथील सरपंचांनाही यात सामावून घेतले. आपला गाव आपली जबाबदारी ही संकल्पना मांडली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्याप्रमाणे ग्रामीण भागात बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश करण्यापूर्वी विलगीकरण कक्षात भरती केले जायचे. ती पद्धत पुन्हा संपूर्ण जिल्ह्यात राबवली. तसेच दुसर्या लाटेत संसर्गाची गती पाहता बाधितांचे होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) जिल्ह्यात बंद करण्यात आले. प्रत्येक बाधित व्यक्तीला थेट कोविड केअर सेंटर मध्ये भरती करण्याचे धोरण राबविले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचे यावेळी डॉ. भोसले यांनी नमूद केले.
राज्य शासनाने सुरु केलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करण्यात आल्याने कोरोना बाधित रुग्णांना शोधून त्यांच्यावर वेळेवर उपचार करणे शक्य झाले. प्रतिबंधात्मक आदेश डावलून विनाकारण सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर फिरणार्या नागरिकांची अॅण्टीजेन चाचणी सुरु करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि संसर्गाचे प्रमाण पाहता महानगरपालिका प्रशासन, पोलीस यांच्या मदतीने विविध भागात मोहीम राबवून प्रतिबंधात्मक आदेशाचे भंग करणार्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. वरिष्ठ अधिकार्यांसह महिन्यातून किमान दोन वेळा प्रत्येक तालुक्याचा दौरा केला. यामुळे तालुकास्तरीय यंत्रणेलाही हुरुप आला. त्यांच्याशी केलेल्या संवादातून अधिकार्यांचे मनोबल उंचावले. त्याचा अपेक्षित परिणाम दिसू लागल्याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणाना उद्युक्त केले. ज्या गावांनी कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, त्या गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांचे मनोबल बाढविले. आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष आणि हिवरेबाजार गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांचे गाव कोरोनामुक्त केले. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बोलावून त्यांचे अनुभव इतर गावातील सरपंच आणि ग्रामस्तरीय अधिकारी यांना ऐकवले, त्याचाही सकारात्मक परिणाम गावागावात झाल्याची माहिती डॉ. भोसले यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे कौतुक
अहमदनगर जिल्ह्याने केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्याकडून त्यासंबंधितीची माहिती घेतली. व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पालक सचिव आशीषकुमार सिंह यांच्यासह विविध मान्यवरांनी दूरध्वनी करुन डॉ. भोसले यांचे कौतुक केले.