नवी दिल्ली – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ शी संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवली
कोविडच्या काळात शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करत नागरिकांना वाहतुकविषयक सेवा मिळवणे शक्य व्हावे यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायदा १९८८ आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८९ शी संबंधित कागदपत्रांची वैधता ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ३० मार्च , ८ जून, २४ ऑगस्ट,२७ डिसेंबर २०२० आणि २६ मार्च २०२१अशा तारखांनाही या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. वाहन फिटनेस वैधता, परवाने(सर्व प्रकारचे)लायसन्स, नोंदणी अथवा इतर संबंधित कागदपत्रे ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध समजली जातील, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
यात अशा सर्व कागदपत्रांचा समावेश आहे,ज्यांची वैधता एक फेब्रुवारी २०२० ला संपली अथवा ३०सप्टेंबर २०२१ पर्यंत संपणार आहे. अशी सर्व कागदपत्रे ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वैध ग्राह्य धरली जावीत,अशा सूचना अंमलबजावणी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करत वाहतुकीशी संबंधित सेवांचा लाभ घेता येणार आहे.