नाशिक – नाशिकचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि त्यात भर म्हणजे एफडीएचे काही अधिकारी या सर्वांनी मिळून नाशिककरांना जास्तीत जास्त संभ्रमावस्थेत कोण ठेवतो याची जणू स्पर्धाच सुरू केलेली आहे. कोरोनाचे रुग्ण मागील सहा दिवसात आज पर्यंत ६००० वरून १५०० पर्यंत कमी होत असताना आता २३ तारखेपर्यंत लॉकडाऊन व त्यात सर्व उद्योग बंद ही भूमिका अनाकलनीय असल्याची टीका भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, ज्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यातील किती उद्योगात कामगारांना राहण्याची सोय होऊ शकते हे माहीत नाही ते आदेश काढतात की कारखान्यात राहण्याची सोय करून उद्योग सुरू ठेवायला परवानगी आहे. म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था ही लघुउद्योजकांची व छोट्या व्यवसायिकांची यांनी केली आहे. आता कामगारांचे पगार, दुकानाचे वा कारखान्याचे जागेचे भाडे , लाईट बिल, सप्लायर चे वेळेवर पैसे, बँकेचे व्याज, घेतलेल्या ऑर्डर चा पुरवठा,आगाऊ दिलेले चेक इत्यादी सर्व चिंता ह्या कोण सोडवणार ? यासाठी पालकमंत्री यांच्याकडे काही उत्तर आहे का ? आमचे तर स्पष्ट असे म्हणणे आहे “ज्यांना स्वतःच्या कष्टाने आयुष्यात उद्योग, व्यवसाय ,व्यापार करुन पैसे कमवण्याचा अनुभव नाही प्रसंगी व्यवसायातील जोखीम घेण्याचा अनुभव नाही त्यांनी असे निर्णय घेताना किमान उद्योजक व्यापाऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे असे सांगत पेशकार यांनी या लॉकडाउनच्या निर्णयाचा तीव्र निषेधही केला.