नाशिक -वर्तमानपत्रे आणि न्युज चॅनल्ससमोर सामाज माध्यमांनी आव्हान उभे केलेय, त्यासाठी वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी, असा मानस इंडिया दर्पण वेब पोर्टलचे संपादक गौतम संचेती यांनी व्यक्त केला. डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ‘प्रसिद्धी माध्यमांसमोरील नवं-नवीन आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृतिप्रीत्यर्थ विसावे पुष्प संचेती यांनी गुंफले.
जिल्ह्यात स्थानिक तसेच राज्यस्तरीय प्रसारमाध्यमांमध्ये आलेले अनुभव विशद करतांना संचेती यांनी काही ठळक घटना मांडल्या.मनमाडचा इथेनॉल प्रकल्प,भुजबळांची येवल्यातील उमेदवारी,शरद पवारांशी आलेला संपर्क याचबरोबर सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने पत्रकारिता करतांना बांधिलकी कायम जपल्याचे स्पष्ट केले. कोरोना काळात अनेक स्थित्यंतरे वर्तमानपत्रांवर झाले आहेत,उद्योग व्यवसाय बंद असल्याने त्याचा परिणाम जाहिरातींवर अर्थात उत्पन्नावर झाला,परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात, त्यात सामाजिक माध्यमांचे आक्रमण.परिणामी प्रसिद्धीचा चेहरा बदलला आहे,खपाचे आकडे फुगवले जात आहेत,शासकीय जाहिराती हा खळगा भरून काढू शकत नाही,वर्तमानपत्राचा मुख्य स्तंभ पत्रकार असून, त्याच्यावर होणारा आघात हेच मूळ आव्हान असल्याचे संचेती म्हणाले.
यू ट्यूब पोर्टल चॅनलचे पेव वाढत असून ते बघणाऱ्यांची संख्या अधिक आहे, परिणामी बातम्यांबद्दल वाचकांमध्ये उत्सुकता राहिली नाही.त्यामुळे वर्तमानपत्रांनी पारंपरिक बातम्यांचे स्वरूप बदलायला हवे,पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या केल्या तर दर्जा वाढेल,दृष्टी आणि दृष्टिकोन यात बदल व्हायला हवा,असा मानस संचेती यांनी व्यक्त केला.बदलत्या काळात वर्तमानपत्र टिकेल का ? हा प्रश्न प्रस्थापितांसमोर आहे,अनेक वर्तमानपत्र ‘स्कीम’वर टिकून आहेत. मोबाईलवरच बातम्या वाचायला मिळत असल्याने सामाजिक माध्यमांचे हे आक्रमण पेलणे अवघड होतं चालल्याचे मत संचेती यांनी व्यक्त केले. याप्रसंगी,डॉ.आर्चीस नेर्लीकर ,भास्कर कदम ,मालेचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर शाह उपस्थित होते. मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले,तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!