त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकेश्वर रोडवरील अंजनेरी शिवरातील आधारतीर्थ आश्रमात तीन दिवसापूर्वी चार वर्षीय अलोक शिंगारे या बालकाचा झालेल्या संशयास्पद खूनाचा उलगडा झाला आहे. या चार वर्षीय बालकाचा खून आश्रमातील १३ वर्षीय मुलाने केला असल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या चार वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवालात गळा आवळून त्याचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला. या खूनाच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. ठोस पुरावे मिळत नसल्याने खूनाच्या गुन्ह्याचा उलगडा होत नव्हता. मात्र गुरुवारी रात्री उशिरा गुन्ह्याची उकल करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.
या आश्रमात १३० हून अधिक मुलं-मुली राहतात, शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि गोर-गरीब कुटुंबातील मुलांसाठी हे आधारतीर्थ आश्रम संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर रोडच्या कडेलाच असल्याने अनेक बडे नेते, सेलिब्रेटी येथे येऊन फंड देऊन जातात. पण नेहमीच तक्रारीमुळे आधारतीर्थ आश्रम चर्चेत असते. त्यामुळे या आधारतीर्थ आश्रमाची देखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.