मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘दि मॅजेस्टिक’या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तूच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधिमंडळाचे प्रधान सचिव डॉ. राजेंद्र भागवत यांच्यासह विधानमंडळ तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वास्तूचे अत्याधुनिकरण आणि सुशोभिकरण येत्या १८ महिन्यात पूर्ण करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सांगितले. फोर्टमधील ‘दि मॅजेस्टिक’वास्तू ही ग्रेड 2 ए हेरिटेज इमारत असून ती जर्जर आणि धोकादायक झाली आहे. तीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे नूतनीकरण करताना या हेरीटेज वास्तूला कोणताही धक्का लावण्यात येणार नाही.
या इमारतीच्या नवीन आराखड्यानुसार तळमजल्यावर भव्य प्रवेशद्वार आणि रिसेप्शन लॉबी असेल तसेच दिवसभर जेवण, कॉफी शॉप त्याचबरोबर मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे. पहिल्या मजल्यावर दिव्यांग अतिथींसाठी युनिव्हर्सल सूट आणि जागतिक दर्जाच्या सोयीसुविधांनी युक्त असे ७२ डिलक्स आणि सुपर डिलक्स अतिथी खोल्या आणि सूट प्रस्तावित आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर कार्यालये प्रस्तावित केली आहेत. तर चौथ्या मजल्यावर प्रेसिडेंशियल सूट प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे गच्चीवर बँकेट हॉल तर तळघरात कर्मचाऱ्यांसाठी सेवा ब्लॉक प्रस्तावित करण्यात आले आहे.
फोर्ट, मुंबई येथील ऐतिहासिक 'दि मॅजेस्टिक आमदार निवासा'च्या नुतनीकरण कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत आज सकाळी झाले.
या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही यावेळी झाले.
मंत्री चंद्रकांत पाटील, रविंद चव्हाण, विधानसभेचे… pic.twitter.com/Syu86OSmY5— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) March 25, 2023
The Majestic Amdar Niwas Renovation Work