नाशिक – पावसाळ्यापूर्वी महाराष्ट्र राज्य वीज वितरण महामंडळातर्फे विविध ठिकाणच्या वाढलेल्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला जातो. हे काम करतांना त्या त्या परिसरातील वीज पुरवठा चार ते पाच तासांसाठी बंद ठेवला जातो.
नाशिकमध्येही अशा कामांना सुरुवात झाली आहे. मात्र कोवीड परिस्थितीमुळे काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाईन असल्याने त्यांना घरूनच परीक्षा देणे सध्या भाग पडत आहे. नेमक्या परीक्षेच्या कालावधीत वीज मंडळ आपल्या या प्रासंगिक कामासाठी कोणतीही पुर्वसुचना न देता ‘बत्ती गुल’ करत असल्यामुळे आॕनलाईन परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची धावपळ होते आहे. अशावेळी शहराच्या ज्या भागात विजपुरवठा सुरू आहे अशा ठिकाणी मित्रकंपनी किंवा नातेवाईकांचे घर गाठून विद्यार्थ्यांना धावपळ करुन आॕनलाईन परीक्षा द्यावी लागत आहे.
सबब, वीज मंडळाने आपल्या या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या पावसाळापूर्व कामामध्ये परीक्षेच्या वेळा बघून आपला कार्यक्रम निश्चित करावा आणि विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची गैरसोय होणार नाही याकडेही लक्ष द्यावे असे आवाहन पालकांतर्फे करण्यात येत आहे