पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरातील मार्केट यार्ड भागात शारदा महिला मंडळाच्या नावाने रास्त भाव दुकानाचा परवाना सुरू होता. सदर परवाना श्रीकृष्ण पांडुरंग ननावरे नावाची व्यक्ती कोणत्याही परवानगीशिवाय चालवत असल्याचे परिमंडळ अधिकारी अमोल हाडे यांनी तपासणी केल्यावर आढळून आले. तसेच तपासणी दरम्यान श्री. हाडे यांना सदर रास्त भाव दुकानात अनेक गंभीर दोष आढळून आले जसे की रास्त भाव दुकान शासन निर्धारित वेळेत बंद ठेवणे, महिला मंडळाचे दुकान इतर व्यक्तीने चालवणे, रास्त भाव दुकानात शासनाने नेमून दिलेले दप्तर न ठेवणे, रास्त भाव दुकानातील तराजू व वजने प्रमाणित नसणे, शिधापत्रिकाधारकांशी अरेराविपणे बोलणे व धमकावणे तसेच तपासणी वेळी प्रत्यक्ष व पुस्तकी शिल्लक धान्यसाठा यात तफावत आढळून येणे असे दोष आढळल्याने प्रशांत खताळ अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी शारदा महिला मंडळ रास्त भाव दुकान परवाना क्रमांक ह ३१ कायमस्वरूपी रद्द केला.
तसेच शारदा महिला मंडळ सद्यस्थितीत अस्तित्वात आहे का याची खातर जमा करण्यात येत आहे. दुकानातील आढळून आलेल्या दोषांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आलेल्या धान्याच्या दंडाची रक्कम ३३ हजार ६६६ वसूल करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. तसेच सर्व परिमंडळ कार्यालयातील सहकारी संस्था व महिला बचत गटामार्फत चालवण्यात येणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही श्री. खताळ यांनी दिल्या आहेत.